अमरावतीमध्ये एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थीनीला न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करण्यात आली. यानंतर पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला या प्रकाराची कल्पना देत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणावर तपास सुरू करत धमकी देणाऱ्याचं इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक केलं. या प्रकरणाची आता राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, “अमरावतीमध्ये घडलेली घटना दुर्दैवी आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना सायबर क्राईमला देण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या सायबर क्राईमच्या घटना याबाबत शासनाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.”
“ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे सायबर गुन्हेगारीत वाढ”
“दोन वर्षात ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळेही सायबर गुन्हेगारी वाढत आहे. याबाबत विद्यार्थीनींमध्येही जनजागृती होणं गरजेचं आहे. त्यांना मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. यासाठी शिक्षण संस्था आणि शासन यांनी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. याबाबतही राज्य महिला आयोगाच्या वतीने राज्य सरकारला शिफारस पाठवली आहे,” अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
“तक्रार नोंदवणाऱ्या विद्यार्थीनीचं मनापासून कौतुक”
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “या घटनेत पुढे येऊन तक्रार नोंदवणाऱ्या विद्यार्थीनीचं मनापासून कौतुक करते. कारण बऱ्याचदा अशा घटना घडल्यावर केवळ बदनामी होईल किंवा कारवाई होईल की नाही या भीतीपोटी अनेक मुली तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की, कोणतीही शेरेबाजी होत असेल, कोणीही असा त्रास देत असेल, छेडछाड करत असेल, तर तातडीने जवळच्या पोलीस स्टेशनला याची नोंद करा.”
व्हिडीओ पाहा :
“आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना”
“या प्रकरणात सायबर ठाणेदार सीमा दाताळकर अतिशय चांगला तपास करत आहेत. मी त्यांच्याशी संपर्क करून आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत,” असंही चाकणकर यांनी नमूद केलं.
नेमकं प्रकरण काय?
अमरावती शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीला इंस्टाग्रामला एका अकाऊंटवरून फॉलो रिक्वेस्ट आली. त्या तरुणीने ती रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. या अकाऊंटचं नाव ‘मिस्टर बेफीकरा’ असं होतं. यानंतर दोघांमध्ये इंस्टाग्रामवर गप्पा होऊ लागल्या आणि मैत्री झाली. वसतिगृहात राहणाऱ्या या इंजिनिअरींगच्या मुलीला आरोपीने प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. पीडित मुलगी पूर्ण विश्वास ठेवायला लागलीय हे हेरून त्या आरोपी मुलाने तिला न्यूड फोटो पाठवण्याचा आग्रह धरला. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात फसलेल्या मुलीने आरोपीला फोटो पाठवले.
न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडे ‘सेक्स’ची मागणी
न्यूड फोटो मिळाल्यानंतर आरोपीने पीडितेकडे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा तगादा लावला. तसेच शारीरिक संबंध न ठेवल्यास तिचे सर्व न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. मुलीने त्याला खुप समजावण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी मुलगा काही ऐकत नव्हता.
हेही वाचा : इन्स्टाग्रामवर मैत्री, प्रेम आणि धोका; तरुणीचे विवस्त्र छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने…
‘मिस्टर बेफीकरा’ अकाऊंट इंस्टाग्रामवरून ब्लॉक
अखेर पीडित मुलीने आपल्या कुटूंबियांना विश्वासात घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठले आणि सायबर क्राईमला तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करीत आहेत. सध्या पोलिसांनी ‘मिस्टर बेफीकरा’ हे अकाऊंट इंस्टाग्रामवरून ब्लॉक केले आहे.