प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा एका कार्यक्रमादरम्यान कपडे बदलत असता लपून व्हिडीओ काढण्यात आला. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. यानंतर त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्या बुधवारी (१ मार्च) अहमदनगरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
रुपाली चाकणकर म्हणाल्या, “राज्य महिला आयोगाला याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही स्वतः दखल घेतली असं नाही. कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत आयुष्यातील असे व्हिडीओ व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या महिलेचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ जेव्हा व्हायरल होतो तेव्हा ही जबाबदारी सायबर सेलची आहे. सायबर शाखेने यातील गुन्हेगारांवर कडकर कारवाई करावी.”
“केवळ एका व्यक्तिचा विषय नाही, तर महाराष्ट्रात…”
“शेवटी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येत आहे. केवळ एका व्यक्तिचा विषय नाही, तर महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडल्या आहेत. आयोगाकडे याच्या तक्रारी आल्या आहेत आणि आतापर्यंत आयोगाने प्रत्येकवेळी या तक्रारींची दखल घेतली आहे,” अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली.
व्हिडीओ पाहा :
“सायबर विभागाने तात्काळ कारवाई करावी”
“सायबर पोलीस महानिरिक्षकांना आम्ही सातत्याने पत्र पाठवत आहोत. या प्रकरणातही राज्य महिला आयोगाने पोलीस विभागाशी पत्र व्यवहार केला आहे. सायबर विभागाने यूट्यूब व्हिडीओ, बातम्या इत्यादीवर तात्काळ कारवाई करावी. तसेच दोषींवर कारवाई करावी,” असंही चाकणकर यांनी नमूद केलं.