Deenanath Mangeshkar Hospital: काही दिवसांपूर्वी पुण्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. यानंतर पीडित महिलेल्या कुटुंबीयांनी पैशाअभावी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पीडितेला रुग्णालयात दाखल करून घेतले नाही असा आरोप केला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यभरातून याबाबत संताप व्यक्त होत आहे. याचबरोबर मंगेशकर रुग्णालयाला टीकेचा समाना करावा लागत आहे. अशात रुग्णालय व्यवस्थापनाने या प्रकरणाची त्यांच्या अंतर्गत चौकशी समितीद्वारे चौकशी करून त्याचा अहवाल जाहीर केला होता.
दरम्यान दीनानात मंगेशकर रुग्णालयाच्या अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालात, पीडित महिलेने वेळेवर उपचार घेतले नाहीत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी पैशांची अट ठेवली नव्हती आणि प्रसूतीतील गुंतागुंतीमुळे पीडितेला मुल दत्तक घेण्याचा सल्ला दिल्याचे दावे करण्यात आले होते. अशात रुग्णालयाच्या अहवालावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
“स्वत:लाच क्लिन चिट देण्याचा प्रयत्न
रुपाली चाकणकर यांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशी समितीचा अहवाल म्हणजे, “स्वत:लाच क्लिन चिट देण्याचा प्रयत्न, त्याला महत्त्व नाही”, असे म्हटले आहे.
या प्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “या प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या अधारे संपूर्ण चौकशी केली जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने स्वत:चाच एक चौकशी अहवाल सादर केला आहे. पण, त्याला काही इतके महत्त्व आणि गांभीर्य नाही. कारण हा स्वत:लाच क्लिन चिट देण्याचा प्रकार या रुग्णालयाच्या माध्यमातून केला जात आहे. मात्र, राज्य सरकारची जी चौकशी समिती आहे तिचा अहवाल सोमवारी सकाळी पुणे पोलीस आयुक्तांच्या समोर सादर केला जाणार आहे.”
रुग्णालयाच्या अहवालात काय?
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अंतर्गत चौकशी समितीच्या अहवालामध्ये तनिषा भिसे २०२० पासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होत्या असे म्हटले आहे. याचबरोबर भिसे यांच्यावर २०२२ साली एक शस्त्रक्रियाही झाली असून त्यामध्ये त्यांना खर्चाच्या ५० टक्के रकमेची सूट देण्यात आल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान या चौकशी समितीच्या अहवालात असेही म्हटले आहे की, या पीडित महिलेची सुखरूप प्रसुती होण्याची शक्यता नसल्याने रुग्णालयाने त्यांना मूल दत्तक घेण्याचा सल्ला दिला होता.