राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पराभव झाला. आता पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली असून सुनेत्रा पवार यांनी काही वेळापूर्वी महाराष्ट्र विधान भवनात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर विधान भवन परिसरात सुनेत्रा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना काही प्रश्न विचारले. सुनेत्रा पवार पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्यामागे आदिती तटकरे उभ्या होत्या. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर आदिती तटकरे यांनी आधी त्या प्रश्नांची उत्तरं सुनेत्रा पवारांना सांगितली आणि नंतर सुनेत्रा पवार यांनी ती उत्तरं पत्रकारांना दिल्याचं माध्यमांशी साधलेल्या संवादात दिसून आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, राज्यसभेसाठी आतापर्यंत इतर कुठल्याही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही, त्यामुळे तुमचा विजय पक्का समजायचा का? यावर आदिती तटकरे हळू आवाजात म्हणाल्या, “१८ तारखेपर्यंत मुदत आहे”. तटकरे यांनी सांगितल्यानंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या, “उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १८ तारखेपर्यंत मुदत आहे.”

सुनेत्रा पवार यांना प्रश्न : तुमची राज्यसभेवर बिनविरोध निवड होईल का?
आदिती तटकरे : १८ तारखेपर्यंत कोणतंही वक्तव्य करणार नाही.
सुनेत्रा पवार : १८ तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे मला वाट बघावी लागेल. त्यानंतरच मी याबाबत वक्तव्य करेन.

सुनेत्रा पवारांना प्रश्न : तुमचा विजय जवळजवळ निश्चित झालाय असं समजायचं का?
आदिती तटकरे : पक्षाचे आभार मानते
सुनेत्रा पवार : पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिल्याबद्दल मी सुरुवातीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष, पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी…
आदिती तटकरे : महायुतीचे नेते
सुनेत्रा पवार : महायुतीचे सर्व नेते, सहकारी, कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचे मी आभार मानते.

हे ही वाचा >> “नेमकं तेच झालं; प्रचारकाळात लोक बोलत नव्हते, पण…”, शरद पवारांनी सांगितलं बारामतीची निवडणूक कशी जिंकली

सुनेत्रा पवारांना प्रश्न : तुम्हाला उमेदवारी दिल्यामुळे पक्षातील नेते आणि मित्र पक्ष नाराज असल्याची चर्चा आहे, खरंच पक्षात कोणी नाराज आहे का?
आदिती तटकरे : अशी नाराजी नाही
सुनेत्रा पवार : अशी नाराजी नाही, मला अशी नाराजी कुठेही दिसलेली नाही. पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांनी बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेतला आहे.

आदिती तटकरे : मला महायुतीच्या सर्व नेत्यांनी शुभेच्छा दिल्यात, माझा फॉर्म भरायला भुजबळ साहेब सर्वात आधी आले.
सुनेत्रा पवार : छगन भुजबळ माझा उमेदवारी अर्ज भरताना माझ्याबरोबर उपस्थित होते. त्यांनीही मला शुभेच्छा दिल्यात. त्यामुळे मला असं वाटतंय की नक्कीच कोणीही नाराज नाही.

सुनेत्रा पवारांना प्रश्न :अजित पवार तुम्हाला उमेदवारी देण्यास तयार नव्हते का?

आदिती तटकरे यांनी हळू आवाजात उत्तर दिलं. त्यानंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या, “माझ्या उमेदवारीबाबत जनतेतून मागणी होत होती. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी देखील अशी मागणी केली होती. मात्र मी आमच्या कार्यकर्त्यांना विनंती केली की माझ्या उमेदवारीचा अग्रह धरू नये. लोकसभेच्या उमेदवारीची मागणी देखील जनतेतूनच झाली होती. यावेळीदेखील तेच झालं.

हे ही वाचा : सुनेत्रा पवारांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून अजित पवार गटात वाद? छगन भुजबळ म्हणाले, “मी इच्छूक होतो”

सुनेत्रा पवारांना प्रश्न : पार्थ पवार या उमेदवारीसाठी इच्छूक होते. मात्र आता ते देखील नाराज असल्याची चर्चा आहे? त्याबद्दल काय सांगाल?
आदिती तटकरे : त्यांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत.
सुनेत्रा पवार : पार्थ पवार यांनी स्वतःच सांगितलं की कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार तुम्हीच राज्यसभेसाठी अधिकृत उमेदवार असलं पाहिजे. स्वतः पार्थ पवार यांचा देखील तसाच अग्रह होता.

त्यानंतर आदिती तटकरे यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींचे आभार मानले आणि सुनेत्रा पवार माघारी फिरल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali chakankar gives hint to sunetra pawar for every question askef by media asc
Show comments