अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीत मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे आणि शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना भरत गोगावले यांनी वादग्रस्त विधान केलं आहे, त्यामुळे महायुतीतील पक्षांमध्ये नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मी आदिती तटकरेंपेक्षा चांगलं काम करू शकतो. महिला आणि पुरुष यांच्यात थोडा तरी फरक येतोच ना, असं विधान भरत गोगावले यांनी केलं आहे. या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भरत गोगावलेंवर टीका करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनीही गोगावले यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. भरत गोगावले, आपल्या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे, अशी टीका चाकणकर यांनी केली.

हेही वाचा- “तीन वाटेकरी असल्याने…”, मंत्रीमंडळ विस्तारावर गुलाबराव पाटलांचं विधान

रुपाली चाकणकर ट्वीटमध्ये म्हणाल्या, “आज एकेठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आलं. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं. पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे.”

हेही वाचा- “राज्यात तीन पक्षाचं सरकार, बिघाडीही होऊ शकते”, राजकीय हालचालींवरून बच्चू कडूंचं सूचक विधान

“भरत गोगावले, आपण त्या जिल्ह्यातून येता जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो. जिथे विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजधानीची स्थापना केली. ज्या रायगडच्या आपल्या राजाने महिलांच्या सन्मानाला जीवापाड जपलं. आपण त्या रायगडमधून येता जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपली पत्नी येसूबाई यांना ‘सखी राज्ञी जयती’ असा सन्मान करून त्यांच्या अनुपस्थित राज्यकारभार चालवण्याचा हक्क दिला. त्यामुळे महिलांच्या सन्मानाची जाणीव सर्वात जास्त तर आपल्याला असायला हवी. आपण केलेल्या वक्तव्याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते,” अशा शब्दात रुपाली चाकणकर यांनी निषेध व्यक्त केला आहे.

भरत गोगावले नेमकं काय म्हणाले?

शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते भरत गोगावले यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबत दावा करताना म्हटलं, “मी आदिती तटकरेंपेक्षा चांगलं काम करू शकतो. महिला व पुरुष यांच्यात थोडा तरी फरक येतोच ना. त्यांच्यापेक्षा मला आमदारकीचा १५ वर्षांचा अनुभव आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन सहाच्या सहा आमदारांसह आमची सगळ्यांची एकच मागणी आहे, रायगडचा पालकमंत्री भरतशेठ.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali chakankar on bharat gogawale statement about aaditi tatkare raigad guardian minister rmm