राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जुन्या संसद भवनात सोमवारी ( १८ सप्टेंबर ) संबोधित केलं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होतं. त्यांनी सिंचन आणि बँक घोटाळ्याचा उल्लेख केला. त्यामुळे पंतप्रधानांनी संबंधित घोटाळ्यांचा चौकशी करावी. चौकशीला आम्ही १०० टक्के सहकार्य करू, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.
यावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “हा प्रकार म्हणजे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न होऊन देखील पुन्हा पुन्हा शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे,” असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
“आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची मागणी पाहून आश्चर्य वाटतं”
‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर रूपाली चाकणकर म्हणाल्या, “राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून गेल्या एक-दीड महिन्यांमध्येच वाढत असलेली काही आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची मागणी पाहून आश्चर्य वाटतं. मुळात हा प्रकार म्हणजे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न होऊन देखील पुन्हा पुन्हा शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे.”
“बरं आम्ही कोणाला खरं समजायचं?? कुणाच्या आठवणीने उमाळा दाटून येणारी व्यक्ती खरी की त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती खरी?” असा सवाल उपस्थित करत रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केलं आहे.
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
पंतप्रधान मोदींना उद्देशून सुप्रिया सुळेंनी म्हटलं, “राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचाराबाबत तुम्ही कोणतीही चौकशी करा. आम्ही त्याला १०० टक्के पाठिंबा देऊ. कारण, मला आठवतंय पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत एक विधान केलं होतं की, एनसीपी ही ‘नॅचरली करप्ट पार्टी’ आहे. त्यांनी दोन घोटाळ्यांचा आरोप केला होता. एक म्हणजे सिंचन घोटाळा आणि दुसरा बँक घोटाळा. मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करते की, पंतप्रधान मोदींची जी इच्छा आहे, ती पूर्ण करा.”
हेही वाचा : “पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवारांना लांडगा म्हणत असेल, तर…”, काँग्रेस नेत्याचं विधान
“आम्ही पूर्ण ताकदीने पंतप्रधानांबरोबर उभं राहू”
“तुम्ही जो भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता, कृपया त्याची चौकशी करा. हे केवळ दोनच घोटाळे नाहीत, इतरही काही घोटाळे आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे, मी नातेसंबंधाबाबत बोलत नाही. संसदेत माझे ८०० भाऊ आहेत. माझा केवळ एकच भाऊ थोडी आहे. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचाराबाबत जी तळमळ आहे. त्यांना भ्रष्टाचाराविरोधात जे काही करायचं आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर उभं राहू”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.