राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांसह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांकडून आज बैठकीचं आयोजन केलं आहे.

मुंबईतील एमईटी येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे अजित पवार गटाचा मेळावा पार पडत आहे. तर वाय बी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाचा मेळावा आयोजित केला आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी व्यासपीठावरून शरद पवार गटातील नेत्यांना इशारा दिला आहे. आम्ही कुणाच्याही विरोधात नाही, आम्हाला बोलायला लावलं तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे, अशा शब्दांत चाकणकरांनी थेट इशारा दिला आहे.

रुपाली चाकणकर आपल्या भाषणात म्हणाल्या, “मी महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. महाराष्ट्रात मला जी ओळख दिली ती पक्षाने आणि लोकनेते शरद पवार यांनी दिली. पवारसाहेब हे आमचं दैवत आहेत. त्यामुळे साहेबांच्या विरोधात आमची कोणतीही भूमिका नाही. आम्ही शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन आणि शाहू, फुले आणि आंबेडकरांचा वारसा आणि विचार घेऊन येथे उपस्थित आहोत. याचा अर्थ असा नाही की, शरद पवारांबरोबर जे आहेत त्यांच्या विरोधात आम्ही नाहीत. आमचा जो विचार आहे, तो कोणाच्या विरोधात नाही. कोणाच्या संघर्षात नाही. कुणावर टीका करण्यासाठी नाही. पण तुम्ही आम्हाला बोलायला लावलत तर आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे.”

हेही वाचा- “शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची…”, रोहित पवारांचं विधान

“मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलं. अडीच वर्षांच्या काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना घरावर तुळशीपत्र ठेवून महाराष्ट्र पिंजून काढला. मोठ्या प्रमाणात संघटना एकत्र केली. या कामाची पोहचपावती म्हणून मला महिला आयोगाचं अध्यक्षपद दिलं. अध्यक्ष पद देताना सांगितलं की, संघटनेचं काम करताना आयोगाचं पद दिलं तर संघटनेला ताकद मिळेल. पण असं काही घडलं की जेणेकरून माझा राजीनामा घेतला गेला. हे राजीनामानाट्य कशासाठी होतं?” असा सवालही चाकणकर यांनी विचारला.

हेही वाचा- “…ही तीन माणसं मला संशयास्पद वाटतात”, अजित पवारांच्या बंडखोरीवर राज ठाकरेंचं मोठं विधान

चाकणकर पुढे म्हणाल्या, “खरं तर, शरद पवारांनी महिला धोरण राबवलं. तिथे महिलांना प्रगतीला संधी द्यायला पाहिजे होती. पण तिथेच महिलांची संख्या कमी का होती? हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. ज्यापद्धतीने माझा राजीनामा घेतला गेला, ती खदखद माझ्या मनात दहा-पंधरा महिन्यांपासून होती. आज पंधरा महिन्यानंतर मी पक्षाच्या व्यासपीठावर आले आहे. हा सन्मान अजितदादा तुम्ही दिला. यासाठी तुम्हाला धन्यवाद देते. कारण पदा इतकी माणसंही लाखमोलाची असताता, हा संदेश तुम्ही प्रत्येक कार्यकर्त्याला देत आहात.”

Story img Loader