लोकसभा निवडणूक अवघ्या एक वर्षावर येऊन ठेपली आहे. तर त्यानंतर काहीच महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होतील. काही राजकीय विश्लेषकांच्या मते लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतात. दरम्यान, राजकीय पक्ष आणि नेत्यांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. आघाडी, युतीत जागावाटपाबद्दल चर्चा सुरु आहेत. तर नेते आणि इच्छूक उमेदवारांनी त्या-त्या मतदार संघांमध्ये मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिल्या आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीत मी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता. ज्या दिवशी मी अर्ज दाखल केला, त्या दिवशी माझी मुलाखत होती आणि नेमक्या त्याच दिवशी मला महिला आयोगाची जबाबदारी मिळाली. ही जबाबदारी घेतल्याने मी विधानसभेच्या उमेवारीसाठी प्रयत्न केला नाही. परंतु २०२४ च्या निवडणुकीत मी निश्चितपणे उमेदवारी मागणार आहे. चाकणकर या टीव्ही ९ मराठीशी बातचित करत होत्या.
हे ही वाचा >> अहमदनगरचं नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा!
रुपाली चाकणकर म्हणाल्या. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून काम करत आहे. त्यामुळे मी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते अजित पवार यांच्याकडे उमेदवारी मागणार आहे. मी खडकवासला मतदार संघातून उमेदवारी मिळवी यासाठी प्रयत्नशील आहे. मला २०१९ च्या निवडणुकीतही उमेदवारीबद्दल विचारण्यात आलं होतं. परंतु तेव्हा मीच नको म्हणाले होते, कारण माझ्याकडे महिला आयोगाची जबाबदारी देण्यात आली होती.