राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि निलेश यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे समर्थक आमदार भास्कर जाधव यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ठोंबरे यांनी राणे पिता-पुत्रांना लक्ष्य केलं. राणेंनी स्वत:सहीत पुत्रांना आवरावं असा सल्ला ठोंबरे यांनी दिला आहे.
राजकीय आरोप प्रत्यारोपांसंदर्भात बोलताना ‘टीव्ही ९ मराठी’ला मुलाखत दिली. “आरोप प्रत्यारोपांचा विषय निघाला. केंद्रीय मंत्री नारायण राणेंची मुलं अनेक शब्द वापरतात. भाजपाचा सुसंस्कृत राजकारणाचा वसा आहे. त्यांचे वडील स्वत: केंद्रात आहेत. भास्कर जाधवांवर टीका करताना त्यांनी जीभ अनेकदा घसरली आहे. कसं बघता या सगळ्या राजकारणाकडे?” असा प्रश्न ठोंबरे यांना विचारण्यात आला. “भाजपा २०१४ साली सब का साथ सब का विकास या घोषणसहीत सत्तेवर आलं होतं. मात्र कुटनिती आणि फक्त आरोप करणे हेच सुरु आहे. नारायण राणेंसारखे ढीगभर नेते आहेत जे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि इतर पक्षांमधून ईडी तसेच इतर यत्रणांचा दबाव टाकून स्वत:कडे घेतलं आहे,” असा टोला ठोंबरेंनी भाजपाला लगावला.
“मुळात भास्कर जाधव यांचे वडील हयात नसताना त्यांच्याबद्दल असं बोलणं यामधून त्यांचे संस्कार दिसतात. राणेंनासुद्धा जशाच्या तसे उत्तर देणारे आपल्या राजकारणात आहेत त्यांनाही म्हणतात सूक्ष्म, लघू, शिशू. दुसऱ्यावर टीका करताना जबाबदारीने करावी. ती वैयक्तिक असता कामा नये. विकासावर, चुकलेल्या गोष्टींवर किंवा खरा भ्रष्टाचार झाला असेल तर त्यावर बोलावं. मात्र भाजपाकडे सुसंस्कृतपणा होता तो अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत संपलेला आहे,” असंही ठोंबरे म्हणाल्या.
“आता फक्त कुटनिती, एकमेकांना वाईट बोलणं, एकमेकांच्या बेडरुममध्ये काय चाललंय याबद्दल बोलणं. राणेंनी तर स्वत:सहीत पोरांना आवरावं कारण तो काळ गेला. भास्कर जाधव म्हणाले की तुम्हाला बाळासाहेबांचा शाप लागला आहे. खरोखरच इथले कर्म इथेच फेडावे लागतात. हिंदू धर्मानुसार जे धार्मिक आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे जे पाप इथे करणार ते इथेच फेडावं लागणार. याची दक्षात त्यांनी घ्यावी आम्ही नाही,” असा टोला ठोंगरेंनी लागवला.