नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी बहुमतापासून दूर राहिली. या पक्षाला त्यांच्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं (एनडीए) सरकार स्थापन करावं लागलं आहे. दरम्यान, भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या मुखपत्रातून या निवडणुकीचं विश्लेषण केलं आहे. ऑर्गनायझर या साप्ताहिकातून संघाचे सदस्य रतन शारदा यांनी भाजपाच्या डोळ्यात अंजण घालणारा लेख प्रसिद्ध केला आहे. शारदा यांनी या लेखात भाजपाच्या अपयशाचं विवेचन करताना महाराष्ट्राचं उदाहरण दिल आहे. त्यांनी म्हटलं आहे की “महाराष्ट्रात भाजपाला काही गोष्टी टाळता आल्या असत्या. जसे की, भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे बहुमत असूनही त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतलं. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढत असलेल्या भाजपाच्या समर्थकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपाने आपली किंमत कमी करून घेतली. दरम्यान, संघ आणि भाजपा नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीतही अजित पवारांमुळे भाजपाचं नुकसान झाल्याचा सूर काही नेत्यांनी आळवला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संघाच्या या टीकेवर, संघ आणि भाजपाच्या बैठकीत झालेल्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील अनेक नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. लोकांच्या भाजपावरील नाराजीचा अजित पवारांना फटका बसला असेल असं वक्तव्य रुपाली ठोंबरे यांनी केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या बैठकीत अजित पवारांबाबत झालेल्या चर्चेला ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

रुपाली ठोंबरे म्हणाल्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत जी काही चर्चा झाली ती त्यांची अंतर्गत बाब आहे. परंतु, अजित पवारांना घेऊन त्यांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही. उलट नागरिकांमध्ये भाजपावरची जी काही नाराजी होती त्याचा अजित पवारांनाच फटका बसला असेल, असं म्हणणं योग्य ठरेल. असो… ती चर्चा किंवा ती बैठक या सर्व आरएसएसच्या अंतर्गत बाबी आहेत. मला त्या चर्चेबाबत काही बोलायचं नाही. त्यांनी कोणती चर्चा करावी किंवा कोणती चर्चा करू नये हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु, अजित पवारांमुळे भाजपाला फटका बसला याबाबत महायुतीत कसलीही चर्चा नाही, असं कोणीही कोणाबरोबर बोललेलं नाही.

हे ही वाचा >> “नाना पटोलेंनी स्वतःला संत समजू नये”, कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्याने राष्ट्रवादीचा संताप; म्हणाले, “सत्तेची मस्ती…”

दरम्यान, रुपाली ठोंबरे या पक्षावर (अजित पवार गट) नाराज असून लवकरच त्या शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. ठोंबरे यांनी यावेळी या सर्व अफवांचं खंडण केलं. त्यांना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ठाकरे गटात येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र ठोंबरे यांनी स्पष्ट केलं की त्या पक्ष सोडून कुठेही जाणार नाहीत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rupali thombare says peoples displeasure with bjp has cost ajit pawar ncp in lok sabha election 2024 asc