‘अनुदाने वाढविली की विकासकामांचा वेग मंदावतो, दिल्लीचे ‘आम आदमी पक्षा’चे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल हे सवंग घोषणा करीत असून, पाणीपट्टी माफी व वीजबिलात त्यांनी निम्मी सवलत दिली आहे. या निर्णयामुळे विकासदर घसरेल. दोन महिन्यांत त्यांचे पितळ उघडे पडेल,’ असे भाकीत ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.
श्रीरामपूर येथे पंचायत समितीने बांधलेल्या कर्मचारी निवासस्थानाचे उद्घाटन बुधवारी पाटील यांच्या हस्ते झाले. राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम केलेल्या पाटील यांनी केजरीवाल यांच्या धोरणांचा समाचार घेतला. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे होते.
पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित या कार्यक्षम होत्या. पण, दिल्लीत वेगळय़ाच पक्षाचे सरकार आले. प्रशासनातल्या द्राविडी प्राणायामामुळे या पक्षाचा जन्म झाला. अनेक गोष्टी मोफत देण्याच्या घोषणा करण्यात आल्या. लोकांना ते भावले. आता ७०० लीटर पाणी दररोज फुकट व निम्मे वीजबिल माफ करण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. मी दिल्लीचा अर्थसंकल्प अभ्यासला, ३३५ कोटी रुपये त्यांचे विजेवर खर्च होतात. आता ६ रुपये दराने दिली जाणारी वीज ३ रुपयांनी देणार त्याचा बोजा तिजोरीवर पडणार. युतीच्या काळातील मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेतलेल्या अशाच निर्णयामुळे नंतरचे आमचे राज्य सरकार अडचणीत आले होते.
सरकारी नोकरांचे पगार करता येत नव्हते. त्यामुळे पाचव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम २००३ सालापर्यंत हप्त्याने द्यावी लागली. युतीच्या वारेमाप उधळपट्टीमुळे वीजनिर्मिती, जलसिंचन तसेच अनेक प्रकल्पांच्या कामांवर परिणाम झाला. १९९७ ते २००४ पर्यंतचा काळ वाइट गेला. विकासाचा वेग या काळात कमी झाला.
‘आप’चे पितळ दोन महिन्यांत उघडे पडेल
‘अनुदाने वाढविली की विकासकामांचा वेग मंदावतो, दिल्लीचे ‘आम आदमी पक्षा’चे मुख्यमंत्री अरिवद केजरीवाल हे सवंग घोषणा करीत असून, पाणीपट्टी माफी व वीजबिलात त्यांनी निम्मी सवलत दिली आहे.
First published on: 02-01-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rural development minister jayant patil slams aam admi party