रिझर्व्ह बँकेने निर्बध टाकल्याने इचलकरंजीतील चौंडेश्वरी सहकारी बँकेत सोमवारी ठेवीदार, ग्राहकांनी ठेवीची रक्कम काढण्यासाठी एकच गर्दी केली. व्यवस्थापनाने बँकेवरील निर्बंधाचे स्पष्टीकरण करून १ हजार रुपयांची रक्कम परत करण्यात येईल, असे स्पष्ट केले. बँकेच्या सर्वच शाखांमध्ये ठेवीदार, ग्राहकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले. तर रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार चौंडेश्वरी बँकेचे समायोजन (क्लिअरींग) थांबले असून सोमवारी त्याची पहिली प्रचिती आली. बँकेचे लाखो रुपयांचे समायोजन थांबल्याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागला.
चौंडेश्वरी सहकारी बँकेची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्याचा परिणाम बँकेच्या समायोजन व्यवहारावर झाला होता. याची दखल घेऊन रिझर्व्ह बँकेने चौंडेश्वरी बँकेचे समायोजन थांबविण्याची सूचना इचलकरंजीतील भारतीय स्टेट बँकेतील क्लिअरींग हाऊसला दिली होती. याचे वृत्त ‘लोकसत्ता’ मध्ये सर्वप्रथम प्रसिध्द झाले. या वृत्तामुळे बँकेच्या सभासद, ग्राहकांमध्ये खळबळ उडाली. परिणामी, बँकेतील ठेवी काढून घेण्यासाठी बँकेच्या प्रधान कार्यालयासह सर्व शाखांमध्ये गर्दी झाली होती.
प्रधान कार्यालयात बँकेचे अध्यक्ष श्रीनिवास सातपुते, अन्य संचालक व देवांग समाजाच्या विश्वस्तांनी ठेवीदार, ग्राहक यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधामुळे केवळ एक हजार रुपयांची रक्कम देता येते असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार ब-याच ठेवीदार, ग्राहकांनी एक हजार रुपयांच्या रकमेवर समाधान मानले. लाखांच्या पटीत ठेवी असलेल्या ठेवीदारांनी आपली लाख मोलाची ठेव अडकली असताना केवळ हजार रुपये घेऊन काय करायचे, अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले.

Story img Loader