अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी झाली असली तरी खेडोपाडय़ातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हाती उसाची बिले न आल्याने नेहमीचा जोश काहीसा ओसरल्याचे दिसत होते. शहरातील महाद्वार रोड, गुजरी पेठ, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी या बाजारपेठांच्या भागात ग्राहकांचा राबता दिसत होता. कडक उन्हामुळे खरेदीचा उत्साह मावळल्याचेही दुकानदारांचे म्हणणे होते.
अक्षयतृतीया साडेतीन मुहूर्तापकी एक असल्यामुळे  मोठे महत्त्व आहे.  खरेदी केलेली वस्तू चिरकाल आपल्याकडे रहावी या हेतूने घर किंवा अन्य कोणतीही स्थावर मालमत्ता तसेच वाहन आणि दागिने खरेदीसाठी हा मुहूर्त सर्वोत्तम मानला जात असल्याने या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा होता.
सर्वसाधारणपणे अक्षयतृतीयेला केलेली खरेदी ही नेहमी आपल्याजवळ राहते. या भावनेमुळेच सोने,चांदी किंवा घराची खरेदी करण्यासाठी अक्षयतृतीयेला महत्त्व असल्याने गुजरीतील सराफांसह दागिन्यांच्या ब्रँडेड दुकानातही दागिने खरेदी केले जात होते. वाहन खरेदीची बाजारपेठही आज तेजीत होती. काही दुचाकी आणि चारचाकी कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी नवीन मॉडेल सादर केल्याने वाहन प्रेमींनी त्याकडे लक्ष वळविले होते. कडक उन्हाळ्याची प्रचिती येऊ लागल्याने एसी, फ्रिज, कूलरची खरेदीही आज मोठय़ा प्रमाणात झाली.
ग्रामीण भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात उसाची बिले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हाती पसा खुळखुळत नसल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांकडून होणारी मजबूत खरेदी यंदा काहीशी रोडावली असल्याचे चित्र बाजारपेठेत दिसत होते. गेले काही दिवस लग्नाचे मुहूर्त कमी होते. पुढील महिन्यात लग्नसराई तेजीत असल्याने वधू-वर व कुटुंबीयांसाठी लागणारी दागिने, पोशाख व अन्य साहित्यांची खरेदी आज उत्साहाने झाली.

Story img Loader