अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात एकूण सात उमेदवार होते. यामध्ये ऋतुजा लटके यांना ६० हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत ठाकरे गटाटा प्रचंड मताधिक्यानं विजय झाल्यानंतर राज्यभरात जल्लोष केला जात आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्व मतदारसंघातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी निवडणुकीचा घटनाक्रम सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.
‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना महेश सावंत म्हणाले की, ऋतुजा लटकेंना निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब लावला होता. अनेक अडथळ्यानंतर ऋतुजा लटकेंनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी सभोवतालचं वातावरण पाहिलं आणि यामध्ये आपला निभाव लागणार नाही, हे त्यांना (भाजपाला) कळालं. यानंतर त्यांच्याच एका नेत्याने पुडी सोडली की, भाजपाने ऋतुजा लटकेंना पाठिंबा द्यावा.
हेही वाचा- Andheri Bypoll: सुनेनं विजयी आघाडी घेतल्यानंतर रमेश लटकेंच्या वडिलांची दिला मोलाचा सल्ला; म्हणाले…
“त्यामुळे राज ठाकरेंना आमचं आव्हान आहे की, त्यांना खरोखर मराठी माणसाबद्दल आणि रमेश लटके यांच्याबद्दल आपुलकी होती, तर त्यांनी आधीच पाठिंबा द्यायला हवा होता. मुंबई महानगरपालिकेचा राजीनामा देण्यासाठी ऋतुजा लटके घरोघर फिरत होत्या. तेव्हा तुम्ही कुठे होता? घरातच होता की झोपले होता? राज ठाकरेंनी तेव्हाच पाठिंबा दिला असता, तर आम्हाला वाटलं असतं, रमेश लटकेंनी त्यांच्यासाठीही कधीतरी काम केलं आहे” अशी टोलेबाजी सावंतांनी केली आहे.