अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या जागेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेनेचे दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न केले जातायत, अशी चर्चा आहे. शिंदे गटाच्या या कथित प्रयत्नानंतर लकटे नेमकं कोणत्या गटाकडून निवडणूक लढवणार असा प्रश्न विचारला जातोय. असे असतानाच पालिकेने कमर्चारीपदाचा राजीनामा मंजूर करावा यासाठी ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे याबाबतचे गूढ आणखी वाढले आहे.
हेही वाचा >>> “CM शिंदेंना भेटलात का? शिंदे गटाने ऑफर दिली का? कोणाकडून लढणार?”; ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. ऋतुजा लटके शिंदे गटात सामील झाल्यास, त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी दिली जाईल, असे म्हटले जात आहे. या सर्व शक्यतांबाबत चर्चा सुरू असताना निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याकरीता त्यांनी आपल्या पालकेतील नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. मात्र अद्यापही हा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. पालिका प्रशासन राजीनामा मंजूर करत नसल्यामुळे त्यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेत त्यांनी पालिका प्रशासनास राजीनामा मंजूर करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. मात्र शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून पोटनिवडणूक लढवत असल्याचा उल्लेख लटके यांच्या याचिकेत नाही. याच कारणामुळे ठाकरे गटाची चिंता वाढल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा >>> राजीनामा मंजूर नाहीच! ऋतुजा लटके यांची आता उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार तातडीची सुनावणी
ऋतुजा लटके या शिंदे गटात जाणार असल्याचे म्हटले जात होते. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतल्याचा दावा केला जात होता. या कथित दाव्यावर खुद्द लटके यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. “तुम्ही माझ्याकडे बघितल्यावर माझ्यावर दबाव आहे असं तुम्हाला वाटतं का? माझ्यावर शिंदे गटाचा दबाव नाही. मला शिंदे गटाकडून कोणतीही ऑफर आलेली नाही. पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्याची माहिती खोटी आहे. मी त्यांना भेटलेले नाही. आमची निष्ठा उद्धव ठाकरे यांच्याशी आहे. माझे पती रमेश लटके त्यांचीही निष्ठा उद्धव ठाकरेंशी आणि बाळासाहेब ठाकरेंशीच होती,” असे ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलेले आहे.