जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. एकीकडे भारतासोबतचा व्यापार पाकिस्तानने बंद केला. तर दुसरीकडे समझोता एक्स्प्रेस असेल किंवा भारतीय चित्रपटांवरील बंदी असेल असे अनेक निर्णय पाकिस्तानने घेतले. भारताच्या निर्णयानंतर बिथरलेल्या पाकिस्तानवर शिवसेनने सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला आहे. तसेच या धाडसी निर्णयाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुकही केले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी तळांवर हल्ले केले. तसेच आता काश्मीरमधील कलम 370 हटवून पाकिस्तानचा कोथळाच बाहेर काढल्याचे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मीर भारताचाच अविभाज्य भाग आहे आणि म्हणून 370 कलम हटविल्याच्या विजयपताका शिवसेनेच्या रूपाने इस्लामाबादच्या रस्त्यावर फडकल्या. पाकिस्तानने भारताशी व्यापारी संबंध तोडून स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली असून त्यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजेत, अशी खोचक टीकाही अग्रलेखातून करण्यात आली आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात?

पाकिस्तानने हिंदुस्थानशी असलेले व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान यापेक्षा दुसरे काय करू शकत होते? त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अशीही धमकी दिली आहे की, कश्मीरातील 370 कलम हटवल्यामुळे ‘पुलवामा’सारख्या घटना पुन्हा घडू शकतात. इम्रान खानचे हे वक्तव्य गंभीरपणे घ्यायला हवे. याचा सरळ अर्थ असा की, पुलवामातील हिंदुस्थानी जवानांवरील हल्ल्यामागचे सूत्रधार पाकिस्तान होते. 40 जवानांच्या बलिदानातून जो अंगार देशात उफाळून आला त्यात 370 कलमाची राख झाली. पाकिस्तानने आता हे मान्य केले पाहिजे की, आमच्या दृष्टीने कश्मीरचा प्रश्न संपला आहे व विषय राहिला आहे तो पाकने बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या कश्मीरविषयी. तो विषय लवकरच निकाली लागेल. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार होत आहे व हा वारू आता कोणीही अडवू शकत नाही.

370 कलमाचा खात्मा केल्यावर इस्लामाबादच्या रस्त्यांवर शिवसेनेची पोस्टर्स व बॅनर्स झळकले. याचा अर्थ असा की, पाकडय़ांच्या हद्दीत शिवसेना घुसली आहे. लवकरच हिंदुस्थानी सेनाही घुसेल व तसे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे इम्रान खान आता जी आदळआपट करीत आहेत त्यातून काय निष्पन्न होणार? पाकिस्तान हिंदुस्थानशी संबंध तोडत आहे याचा सगळय़ात जास्त फटका त्यांनाच बसणार आहे. ­पाकिस्तानच्या हिंदुस्थानद्वेषावर तरारलेल्या राजकारणावर पाणी पडले. चर्चेची आता गरज नाही. अमित शहा यांनी कश्मीरात पहिले पाऊल टाकले व दुसरे पाऊल पाकव्याप्त कश्मीरात पडेल हे नक्की. हिंदुस्थानच्या भूमीवर आमचाच कायदा चालेल. त्यासाठी पाकडय़ांना, अमेरिकेला आणि बिनदाताच्या युनोला विचारण्याची गरज नाही. हिदुस्थानच्या भूमीवर आमचाच कायदा चालेल. अमेरिकेचे प्रे. ट्रम्प म्हणतात कश्मीरातून 370 कलम हटवताना त्यांच्याशी चर्चा केली नाही. यालाच देशाचे सार्वभौम म्हणतात. इराकचा घास गिळताना न सद्दाम हुसेन यांना फासावर लटकवताना अमेरिकेने हिंदुस्थानला विचारले होते काय?