युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळीतून निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर नाशिकमध्ये बोलताना आदित्य ठाकरेंनी ठाण्यातून निवडणूक लढणार असल्याचं वक्तव्य केलं. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार सचिन अहिर आणि सुनील शिंदे हे शिंदे गटात येऊ शकतात, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
निहार ठाकरेंची वरळी विधानसभा मतदासंघातून चाचपणी सुरु आहे का? असा प्रश्न विचारल्यावर संजय शिरसाट म्हणाले, “आदित्य ठाकरेंविरोधात सचिन अहिर किंवा सुनील शिंदेंही का उमेदवार होऊ शकत नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंना कुठून उभं राहायचं हा प्रश्न पडणार आहे. सचिन अहिर आणि सुनील शिंदेही आमच्या पक्षात प्रवेश करु शकतात. कारण, यांना सर्वजण कंटाळले आहेत. दोघांच्या ताकदीवर आदित्य ठाकरे निवडून आले आहेत. अहिर आणि शिंदे आले तर त्यांचं स्वागतच आहे.”
हेही वाचा : सत्यजीत तांबे प्रकरणावर नाना पटोलेंचं मोठं विधान; म्हणाले, “चुका झाल्यात, पण…”
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानाबद्दल विचारल्यावर संजय शिरसाट यांनी म्हटलं, “आदित्य ठाकरेंच्या मानगुटीवर अहंकाराचं भूत बसलं आहे. सत्ता गेली, आमदार सोडून गेले, पक्षही संपत आहे, तरी अहंकार कमी होत नाही. या अहंकारात संजय राऊत पेट्रोल टाकण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या विधानाला जास्त महत्व देण्याचं कारण नाही,” असं संजय शिरसाटांनी स्पष्ट केलं.
हेही वाचा : “वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण…”, आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
“मुख्यमंत्री घाबरले आहेत. त्यांना वरळीतून लढायचं नसेल, तर आमदारकी आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. मी ठाण्यातून लढतो. सध्या महाराष्ट्रातील वातावरण इतकं पेटलं आहे की, निवडणूक झाली तर एकच रंग दिसेल; तो फक्त भगवा, भगवा आणि भगवा. आता लोक विचारतील, भगवा रंग कोणाचा? कोणत्या गटाचा? त्यांना सांगू इच्छितो की भगवा रंग शिवसेनेचा,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.