माझ्यावर कुणी हल्ला केला, हे मला माहित आहे. आम्हाला त्यांची नावं कळली आहेत. माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना संरक्षण द्या. सरकारने त्यांच्या संरक्षणाची काळजी घ्यावी, असा सूचक इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. करोना घोटाळ्याची चौकशी होऊ नये म्हणून हा हल्ला झाला असेल, तर पुढच्या आठवड्यात पुन्हा पालिका आयुक्तांकडे जाणार, असं संदीप देशपांडेंनी सांगितलं.
“ज्यांनी माझ्यावर हल्ला केला, त्यांचा दोष नाही, त्यांना ज्यांनी हल्ला करण्यास सांगितलं, ते समोर आलं पाहिजे. ठाकरे गटाला लोकांना वापरून घेण्याची सवय आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे. ४८ तास आधी बाळा कदमला अटक झाली. तो बाळा कदम कोण आहे? कुणाचा माणूस आहे? यामागे कुणाचा हात आहे? हे सर्वांना माहित आहे,” असं संदीप देशपांडेंनी म्हटलं.
हेही वाचा : “छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगाबादशी काय संबंध?”, नामांतरावरून इम्तियाज जलील यांचा सवाल; म्हणाले…
यावर आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “अशा भ्याड हल्ल्यांचा आम्ही निषेध व्यक्त केला आहे. धागेदोरे कुठं जातात, याची जबाबदारी सरकारची आहे. खऱ्या आरोपींना अटक व्हावी, ही आमची आग्रहाची मागणी आहे. संदीप देशपांडेंनी यापूर्वी अनेक आरोप-प्रत्यारोप केले आहेत. राजकारणात मोठी नावं घेतली की सनसनाटी निर्माण होते. ती करण्याचा प्रयत्न होतो का? असा प्रश्न उपस्थित होतो,” असा सचिन अहिरांनी सांगितलं.
हेही वाचा : बेळगावबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी केली दिलगिरी व्यक्त; म्हणाले…
“संदीप देशपांडेंनी करोनाबद्दल केलेल्या आरोपांची चौकशी सुरु आहे. ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ होऊदे’. संदीप देशपांडे नेहमीच प्रशासनाच्या विरोधात बोलतात. पण, आज अचानक आयुक्तांवर त्यांचं प्रेम आलं आहे. आयुक्तांवर त्यांनी अनेकवेळा टीका आणि आरोप केले आहेत. आज त्यांच्यात बदल झाला आहे. मात्र, महाराष्ट्रात हल्ले वाढत चालले आहेत. आमदारांवर हल्ले होत आहेत,” असं सचिन अहिर यांनी सांगितलं.