शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह तीन आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटातील नेत्यांनी विधिमंडळ सचिवालयाकडे यासंबंधीचं पत्र सादर केलं आहे. तसेच राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांच्याकडेही याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या मुद्दय़ावर विधान परिषदेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे गट आणि काँग्रेस आमदारांनी विधान परिषदेच्या अधिवेशनात आपली मागणी मांडली. यावरून अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (१७ जुलै) मोठा गोंधळ झाला होता.
दरम्यान, याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. सचिन अहिर यांनी विधान परिषदेत त्यांची मागणी लावून धरली होती. सचिन अहिर यांनी काल (शुक्रवार, २१ जुलै) संध्याकाळी टीव्ही ९ मराठीशी याविषयी बातचित केली. सचिन अहिर यांना यावेळी विचारण्यात आलं की, नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे यांच्या निलंबनाची तुम्ही मागणी केली होती, त्यावर पुढे काय कार्यवाही झाली? या प्रश्नावर सचिन अहिर म्हणाले, तालिका सभापतींनी त्याबाबतचा निर्णय दिला आहे. सोमवारी किंवा मंगळवारी आमचे गटनेते आणि विधीमंडळातील सर्व सदस्य एकत्र बसून पुढची रणनीति ठरवू.
आमदार सचिन अहिर म्हणाले, ते (नीलम गोऱ्हे आणि मनिषा कायंदे) शिवसेनेत असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे. परंतु तांत्रिकदृष्ट्या ते योग्य आहे की नाही हे अजून ठरायचं आहे. आम्ही याबाबत काय भूमिका मांडायची ते गटनेत्यांच्या बैठकीत ठरेल. आत्ताच सगळ्या गोष्टी तसेच रणनीतिवर बोलणं उचित ठरणार नाही.
हे ही वाचा >> “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री…”, आमदार अमोल मिटकरींचं ट्वीट चर्चेत…
दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्यामुळे त्या उपसभापती पदावर राहू शकत नाहीत, हा विरोधी पक्षांचा आक्षेप तालिका सभापती निरंजन डावखरे यांनी गुरुवारी फेटाळून लावला. त्यामुळे डॉ. गोऱ्हे या उपसभापतीपदावर कायम राहतील, हे आता स्पष्ट झालं आहे.