सातारा नगर पालिकेच्या अध्यक्षपदी सचिन सारस यांची निवड निश्चित झाली आहे. त्यावर सोमवारी शिक्कामोर्तब हाईल. मात्र उपनगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असेल या प्रश्नाचे उत्तर गुलदस्त्यात आहे. दीपाली घोडके, दिनाज शेख आणि अ‍ॅड. बाळासाहेब बाबर यांच्या नावाची चर्चा दिवसभर सुरू होती.
सातारा नगरपालिकेच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणानुसार अनुसूचित जातीसाठी ही जागा राखीव आहे. सचिन सारस यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड नक्की आहे. अध्यक्षपद आता आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीकडे असल्याने उपनगराध्यक्षपद उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील सातारा विकास आघाडीकडे जाणार आहे. त्यामुळे उपनगराध्यक्षपदासाठी चुरस आहे. दीपाली गोडसे यांना नगराध्यक्षपद मिळणार अशी शक्यता असताना सुजाता राजेमहाडिक यांनी बाजी मारली होती. त्यावेळी दिनाज शेख या ही स्पध्रेत होत्या मात्र त्यांनी नेत्यांचा आदेश मानून माघार घेतली. त्यामुळे खा.भोसले आता कोणाला हे पद देतात याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. अपक्ष निवडून आलेले अ‍ॅड. बाळासाहेब बाबर हे विरोधीपक्ष नेते आहेत. मुळचे ते खा.भोसले समर्थक आहेत. खा.भोसले यांच्या बेरजेच्या राजकारणात अ‍ॅड. बाबर यांचेही नाव चच्रेत आहे. सातारा विकास आघाडीचे माजी उपाध्यक्ष रवींद्र पवार हेही अपक्ष निवडून आले होते. अनुभवी उपनगराध्यक्ष असावा असा विचार समोर आला तर अ‍ॅड. बाबर यांचे नावही समोर येऊ शकते. अ‍ॅड.दत्तात्रय बनकर हे पक्षप्रतोद आहेत तसेच माजी उपनगराध्यक्ष होते अनुभवाच्या निकषावर तेही या पदावर दावा सांगू शकतात. अखेरीस खा.भोसले  ज्या उमेदवाराला पसंती देतील तो उमेदवार उपनगराध्यक्ष होईल आणि पूर्ण काळासाठी होईल की दोन विभागात होईल याची उकल सोमवारी होणार आहे. दरम्यान नगराध्यक्ष सुजाता राजेमहाडिक यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन कार्यकाळात केलेल्या कामांची माहिती दिली.

Story img Loader