पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका करणं राहुल गांधी यांना चांगलच महागात पडलं आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याप्रकरणी राहुल गांधींवर मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आज न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयानंतर विविध राजकीय राजकीय प्रतिक्रिया उमटत असून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही या निर्णयावरून मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा- मोदींचा ‘तो’ उद्धार राहुल गांधींना पडला महाग; दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
सचिन सावंतांचं मोदी सरकावर टीकास्र
एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते, असे म्हणत सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तसेच हाच नियम लागू केला तर पंतप्रधान मोदींसह भाजपाचे अनेक नेत्यांना जन्मठेप होईल, असेही ते म्हणाले.
प्रियंका गांधी-वाड्रांचा मोदी सरकावर हल्लाबोल
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. “घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझा भाऊ कधी घाबरला आणि घाबरणारही नाही… सत्य बोलत आलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे,” असं प्रियंका गांधींनी ट्वीट करत म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटच्या कोलार येथे आयोजित सभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यानंतर गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. गेल्या आठवड्यात याप्रकरणी सुनावणी पार पडली होती. आज याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच राहुल गांधी यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.