एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेतील आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडण्या अगोदर आणि महाविकास आघाडी सरकार कोसळण्या अगोदर शिवसेना नेते, आमदार प्रताप सरनाईकांवर ईडी कडून कारवाई सुरू होती. सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या तब्बल ११.४ कोटींची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतली होती. मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपाचे सरकार राज्यात आल्याने आणि सत्ता बदल झाल्यानंतर सरनाईकांवरील कारवाई टळणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता ती मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीला हिरवा कंदील मिळाल्याने, शिंदे गटासोबत असणाऱ्या प्रताप सरनाईकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे सरनाईकांना टोला लगावला आहे.
हेही वाचा – …मला भीती आहे किशोरी पेडणेकर प्रकरणात ‘या’ सगळ्यांचा मनसुख हिरेन होऊ नये – किरीट सोमय्या
‘घाबरुनी भयंकर ज्या छळाला केले ‘प्रताप’ मविआ सरकार पाडण्याला, सरनाईक विचारती भाजपाला हेची फळ काय मम तपाला?’ असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मार्च महिन्यात झाली होती कारवाई –
या वर्षी मार्च महिन्यात ईडी कडून सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग आणि पुर्वेश आणि त्यांची कंपनी विहंग ग्रुप यांच्या मालकीची ही सर्व मालमत्ता आहे. यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि एका भूखंडाचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी २०१६मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. या सर्व गैरव्यवहारातून गुंतवणूकदारांचं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा ईडीनं केला आहे.