शिवप्रताप दिनाचं औचित्य साधून राज्य सरकारने काल (गुरुवार) प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाच्या कबरीभोवतीचे बेकायदा बांधकाम पाडले. या कारवाईमुळे भाजपाकडून जल्लोष केला जात आहे. त्यावरून काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

हेही वाचा – Jitendra Awhad Arrested : जितेंद्र आव्हाडांच्या अटकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिक्रिया, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले…

सचिन सावंत म्हणाले, “अफझलखाननेच अतिक्रमण केले होते या थाटात अफझलखानच्या कबरीवरील अतिक्रमण काढण्याचा जल्लोष भाजपा करते आहे. कोण करतंय तर ज्यांचे स्वतःचे अतिक्रमण आहे ते! २०१४ ते १९ फडणवीस सरकारने कारवाई का केली नाही? १ जाने २०१७ ला उच्च न्यायालयाने बेअदबी याचिकेवर निर्वाणीचा इशारा दिला तरीही नाही.”

हेही वाचा – मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांना अटक

याशिवाय “भाजपा म्हणते त्याप्रमाणे हे अतिक्रमण काढण्यासाठी कोणतीही तांत्रिक अडचण नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नव्हती. आजही २०१७ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचेच पालन आहे. महाविकास आघाडी सरकार तर कोरोनाच्या आघातात व्यस्त होते पण फडणवीस सरकारला काय झाले होते?” असा सवालही सावंत यांनी केला आहे.

याचबरोबर, “आणि हो! हे अतिक्रमण अंतिमतः निघाल्याचे स्थानिक शिवप्रेमी मुस्लीम समाज आणि काँग्रेस पक्षाने साखर वाटून स्वागत केले आहे. शेवटी एवढे वर्षे केवळ राजकारणासाठी भाजपा – संघाने वापरलेला एक मुद्दा संपला याचे स्वागत नको का व्हायला? हे वाहिन्यांवर दाखवणार नाहीत.” असंही सचिन सावंत म्हणाले आहेत.