Sachin Sawant महाविकास आघाडीचं जागावाटप होताना दिसतं आहे, फॉर्म्युले ठरत आहेत आणि बिघडतही आहेत. काँग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर झाली. ज्यानंतर सचिन सावंत यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. मात्र त्यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी दिली गेली. त्यामुळे ते नाराज झाले आहेत. वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वरुण सरदेसाई उमेदवार आहेत. आता सचिन सावंतही या जागेसाठी आग्रही आहेत. त्यांनी याबाबत काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांना विनंती केली आहे.

शनिवारी आली काँग्रेसची तिसरी यादी

महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील काही काँग्रेस नेत्यांची दिल्लीत शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा झाली. यानंतर २६ ऑक्टोबर रोजी सकाळी काँग्रेसकडून २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. तर आताही १६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम हा मतदारसंघ दिला आहे. मात्र सचिन सावंत हे या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी वांद्रे पूर्व हा मतदारसंघ मागितला आहे. त्यामुळे आता या जागेवरुन महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच पाहण्यास मिळणार अशी चिन्हं आहेत.

हे पण वाचा- काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; बाबा सिद्दिकींच्या मतदारसंघातून कोणाला उमेदवारी?

सचिन सावंत यांची पोस्ट काय?

“मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तिथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो.” अशी पोस्ट सचिन सावंत यांनी केली आहे.

कुणाची नावं आहेत तिसऱ्या यादीत?

विधानसभा मतदारसंघउमेदवार
खामगावराणा दिलीप कुमार सानंदा
मेळघाट – एस.टीडॉ.हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली एस.टीमनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रसमाणिकराव ठाकरे
नांदेड दक्षिणमोहनराव मारोतराव अंबाडे
देगलूर – एस.सीनिवृत्तीराव कोंडीबा कांबळे
मुखेडहणमंतराव वेंजकतराव पाटील बेटमोगरेकर
मालेगाव मध्यएजाज बेग अजिज बेग
चांदवडशिरीषकुमार वसंतराव कोतवाल
इकतपुरी – एस.टीलकीभाऊ भिका जाधव
भिवंडी पश्चिमदयानंद मोतीराम चोरघे
अंधेरी पश्चिमसचिन सावंत
वांद्रे पश्चिमआसिफ झकेरिया
तुळजापूरकुलदीप धिरज आप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर उत्तरराजेश भरत लाटकर
सांगलीपृथ्वीराज गुलाबराव पाटील

मागच्या वेळी वांद्रे पूर्व मतदारसंघातून कोण निवडून आलं होतं?

वांद्रे पूर्व या मतदारसंघातून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. यावेळी हा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे गेला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या झिशान सिद्दिकींनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. तसंच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षावर टीका करत त्यांनी त्यांचं म्हणणंही मांडलं होतं. आता वरुण सरदेसाईंना हा मतदारसंघ गेल्याने सचिन सावंतही नाराज आहेत.