राज्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चा सुरू असलेल्या अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कालपासून जोरदार राजकीय घडामोडी सुरू होत्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असं म्हटलं होतं. त्यांनंतर आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून येत होते. त्यावरून भाजपा आपला उमेदवार मागे घेणार असल्याचं निश्चित मानलं जात होतं. अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. मुराजी पटेल हे आता उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. भाजपाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून तसेच सर्वसामान्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत आणि वेगवेगळे अंदाजही लावले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
“अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत पराभवाच्या भीतीने उमेदवार मागे घेतला, तरी शिवसेना फोडण्याचे पाप आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करताना त्यांना दिलेला त्रास व मानहानी विसरता येणार नाही.” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून बरच राजकारण रंगलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरीतील के-पूर्व विभाग कार्यालयातील सेवेत ऋतुजा लटके कार्यरत होत्या. गेली १४ वर्षे त्या पालिकेच्या सेवेत आहेत. निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांना आपल्या कार्यकारी सहाय्यक (लिपीक) पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रावरून तांत्रिक बाब उपस्थित करीत प्रशासनाने त्यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रशासनाचा दबाव असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. सलग तीन दिवस ऋतूजा लटके यांच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ठाण मांडून होते. मात्र प्रशासनाने दाद न दिल्यामुळे अखेर लटके यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महानगरपालिकेला फटकारतानाच लटके यांच्या बाजूने निकाल दिला होता.