भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. नड्डा आता जून २०२४ पर्यंत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत घोषणा केली आहे. यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी या पार्श्वभूमीवर भाजपाला एक खोचक प्रश्न विचारला आहे.

“जे पी नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कालावधी वाढवण्यात आला – काँग्रेसला सतत प्रश्न विचारणाऱ्या भाजपाला प्रश्न आहे की, निवडणूक का नाही झाली?” असं सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

नड्डा यांचा कार्यकाळ वाढीचा निर्णय भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेण्यात आला आहे. जे. पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ दुसऱ्या कुणाच्या गळ्यात पडणार का? याची चर्चा सुरू होती. मात्र तसं घडलेलं नाही.

काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून आणि नेतृत्वावरून भाजपा सातत्याने टीका करत आलेली आहे. या पार्श्वभूमीवरच सचिन सावंत यांनी भाजपाला नड्डाचा कार्यकाळ वाढीच्या निर्णयावरून खोचक प्रश्न विचारल्याचे दिसत आहे.