महाराष्ट्रातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग खरं नसल्याचं आसाम सरकारने म्हटलं आहे. एवढच नाहीतर सहावं ज्योतिर्लिंग आसाममध्ये असल्याचा दावा देखील आसाम सरकारने केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा हे महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र पळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आता त्यांच्यावर होत आहे. आसाम सरकारच्या या दाव्यावरून आता विरोधी पक्षांकडून आसाम सरकार आणि भाजापवर जोरदार टीका सुरू आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही यावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
“भाजपाशासित आसाम सरकारने महाराष्ट्रातील भीमाशंकर ज्योतिर्लिंगावर दावा केल्यानंतरही शिंदे फडणवीस सरकार चूप आहे. हा महाराष्ट्र द्रोह नाही का?मविआ सरकार तोडताना केलेल्या मदतीची ही परतफेड आहे का? येत्या महाशिवरात्रीला भाजपा नेत्यांना महाराष्ट्रातील शिवभक्तांना तोंड दाखवता येईल का?” असं सचिन सावंत म्हणाले आहेत.
काँग्रेसकडून आसाम सरकारचा निषेध –
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या अगोदरही काल भाजपावर हल्लाबोल केला. “केवळ उद्योगच नव्हे तर आता भाजपाला महाराष्ट्रातून भगवान शंकरांनाही हिसकावून न्यायचे आहे. आता भाजपाच्या आसाम सरकारचा दावा आहे की भीमाशंकर येथील सहावे ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात नसून आसाममध्ये आहे. या अत्यंत आगाऊपणाच्या दाव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.” असं ते म्हणाले होते.
याशिवाय, दुसऱ्या ट्विटमध्ये सावंत यांनी “शिंदे फडणवीस सरकारने तात्काळ याबाबत भूमिका स्पष्ट करुन आसाममधील भाजप सरकारच्या या निंदनीय कृतीचा निषेध नोंदवला पाहिजे. भाजपाने केवळ महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्याच नव्हे तर तमाम भारतीयांच्या श्रद्धा, भावना दुखावल्या आहेत. भाजपाचा महाराष्ट्राबद्दलचा आकस सातत्याने दिसून येत आहे.” असं म्हणत टीका केली होती.