सातारा : ग्रामीण भागातील नवोदित खेळाडूंच्या सुविधेसाठी माणदेशी फाउंडेशनने बांधलेले स्टेडियम निश्चितच तरुणांसाठी क्रीडा केंद्र बनेल, असा विश्वास मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने व्यक्त केला. येथील माणदेशी फाउंडेशनने मेगा सिटी येथे बांधकाम केलेल्या महाराष्ट्रातील ग्रामीण इनडोअर स्पोर्टस् बास्केटबॉल व बॅडमिंटन सेंटरचे उद्घाटन सचिन तेंडुलकर याच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सचिन तेंडुलकर फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ.अंजली तेंडुलकर, संचालिका सारा तेंडुलकर, माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, विजय सिन्हा, माणदेशी फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, विश्वस्त अनघा कामत-सिन्हा, जवाहर देशमाने, दिव्या सिन्हा आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
तेंडुलकर म्हणाला, ‘माणदेशी फाउंडेशनचे संचालक म्हणून क्रीडा कार्यक्रम चालवणारे प्रभात सिन्हा यांनी इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियमची संकल्पना केली व ती यशस्वी होत आली. हे स्टेडियम ग्रामीण तरुणांमध्ये क्रीडा आणि शारीरिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एका व्यापक उपक्रमाचा एक भाग आहे, ज्यामुळे प्रतिभा विकास आणि समुदाय सहभागासाठी व्यासपीठ उपलब्ध होण्यास निश्चितच मदत होईल व इनडोअर स्टेडियम क्रीडा क्रियाकलापांचे केंद्र बनेल, ज्यामुळे स्थानिक तरुणांना फायदा होईल आणि निरोगी जीवनशैलीला चालना मिळेल.’
हेही वाचा >>>लाच मिळविण्याच्या प्रयत्नात सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश चौकशीसाठी ताब्यात
या कार्यक्रमानंतर सचिन तेंडुलकर आणि सारा तेंडुलकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला, तरुण खेळाडूंना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि चिकाटी व कठोर परिश्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. याबरोबरच माणदेशी फाउंडेशन संचलित क्रीडा संकुलातील नवोदित खेळाडूंबरोबर गप्पागोष्टी करीत दिलखुलासपणे संवाद साधीत तेंडुलकर कुटुंबाने फनी गेम रस्सी खेच खेळात सहभाग नोंदविला. याबरोबरच सचिन तेंडुलकरने मोबाइलमध्ये सेल्फी काढून उपस्थित खेळाडूंचा आनंद द्विगुणित केला.
या कार्यक्रमात सचिन तेंडुलकर फाउंडेशन आणि माणदेशी फाउंडेशन यांच्यातील हे सहकार्य महाराष्ट्रातील ग्रामीण समुदाय या कार्यक्रमादरम्यान दिव्या प्रभात सिन्हा यांनी ‘माणदेशी चॅम्पियन्स’ या ॲथलिट्सवरील पुस्तकाच्या प्रकाशनाची संकल्पना सादर केली.