स्वच्छ मुख अभियानाचा राजदूत म्हणून सचिन तेंडुलकरची निवड राज्य सरकारने केली आहे. काही वेळापूर्वीच हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सचिनने आपण कधीही गुटखा, पान मसाला, सुंगधी सुपारी यांच्या जाहिराती स्वीकारल्या नाहीत. माझ्या वडिलांना मी तसं वचन दिलं होतं. आज राज्य सरकारने मला जी जबाबदारी दिली ती पार पाडेन असंही सचिनने म्हटलं आहे. तसंच मुखाचा कॅन्सर हा लोक ओढवून घेतात त्यापासून सावध रहा असं आवाहनही सचिनने केलं आहे. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन तेंडुलकरचं भरभरुन कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी ?

“स्वच्छ मुख अभियानाचे राजदूत म्हणून काम करण्यास आज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी मान्यता दिली. आज अतिशय आनंदचा दिवस आहे की महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभियान यासाठी राजदूत होण्याचं सचिन तेंडुलकर यांनी मान्य केलं.यासंदर्भातला करारही त्यांनी केला आहे. करार केला असला तरीही हा पूर्णपणे निशुल्क करार आहे. आज घडीला मुखाचे रोग आहेत त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहण्यास मिळतो. ओरल हेल्थ हा ऐरणीचा विषय झाला आहे. ओरल कॅन्सर हा शाळेच्या मुलांमध्येही पाहण्यास मिळतो.” असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

सचिन तेंडुलकरचं कौतुक

“शाळेतल्या मुलांमध्ये प्री कॅन्सर स्टेज आम्हाला एका शिबीरात आढळली होती. याचं मुख्य कारण हेच आहे की गुटखा, मावा, खर्रा अशा वेगवेगळ्या नावांनी हे खाण्याची सवय मुलांना लागते. सरकारच्या वतीने कितीही सांगितलं तरीही हवी त्या प्रमाणात ती होत नाही. सचिन तेंडुलकरसारखा व्यक्ती यासंदर्भात बोलतो, आवाहन करतो त्याचा प्रचंड परिणाम तरुणाईवर होतो. तरुणाईला सचिनजींबद्दल आकर्षण आणि प्रेम आहे. त्यामुळे या मोहिमेसाठी सचिन तेंडुलकर ही अत्यंत सुयोग्य निवड आहे. दुर्दैवाने अनेक सेलिब्रिटी मग त्या क्रिकेट विश्वातील असोत किंवा बॉलिवूडमधील असोत या मोठ्या प्रमाणात जर्दा, सुपारी, सुगंधी सुपारी या व्यसनाधीन करणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात जाहिराती करतात. यातून जणूकाही तो लाईफस्टाईलचा एक भाग आहे असं दर्शवलं जातं. अशावेळी अशा कुठल्याही जाहिरातींमध्ये आपण सचिन तेंडुलकर यांना पाहिलेलं नाही. त्यामुळेच ही निवड अत्यंत सुयोग्य आहे.” असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

तुम्ही जेव्हा सेलिब्रिटी असता तेव्हा एक जबाबदारीही असते. ती जबाबदारी सचिन तेंडुलकर पार पाडतात. सचिन तेंडुलकर हे भारतरत्न असल्यामुळे आपल्या समाजाच्या प्रति जी कमिटमेंट आहे त्या अनुरुप ते वागत असतात. म्हणूनच त्यांच्यासारखा व्यक्ती जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगेल तेव्हा त्याचा तरुणाईवर सकारात्मक परिणाम होईल. एका स्मितहास्याने आपल्याला अनेक लढाया जिंकता येतात. सगळ्यांना चांगलं स्मित हास्य करता यावं हा यामागचा उद्देश आहे. असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.