सचिन वाझे प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. महत्त्वाचं म्हणजे सभागृहात सीडीआरचा हवाला देत फडणवीस यांनी तत्कालीन तपास अधिकार सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. या प्रकरणातील सीडीआरवरून “फडणवीस २ आरोपींना पाठीशी घालत आहेत,” असा आरोप करत काँग्रेसने फडणवीसांना सल्ला दिला आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी सीडीआर दाखवत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा हवाला देत वाझे यांनी हिरेन यांची हत्या केली असल्याचंही फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांनी मिळवलेल्या सीडीआरवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
आणखी वाचा- फडणवीसांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी – सचिन सावंत
“कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेंद्र फडणवीसजी मिळालेल्या CDRचा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून, ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती,” असं सावंत यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा- “अखेर सत्तेसाठी आणखी किती लोकांना वाचविणार उद्धवजी?”
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या 15 मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती ३ ऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. @Dev_Fadnavis जींना मिळालेल्या CDR चा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती pic.twitter.com/H1OwuSYUjO
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 17, 2021
यापूर्वीही सीडीआरवरून फडणवीसांवर टीकास्त्र
“सीडीआर मिळवणे हा गुन्हा आहे. नागरिक म्हणून तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे फडणवीस यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे ही काँग्रेसचीही भूमिका आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रँचने CDR रॅकेट उघडकीस आणून त्यातील दोषींवर कारवाई केली होती. सामान्य लोकांना एक न्याय आणि फडणवीसांना दुसरा न्याय हे योग्य नाही. ते मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले आहेत. जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याकडील माहिती तपास यंत्रणांना देऊन सहकार्य करावी अशी अपेक्षा आहे,” असं काही दिवसांपूर्वी सावंत म्हणाले होते.