विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत २४ नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करून शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर कामकाज स्थगित करण्यात आले.
माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, प्रभाकर कुंटे, शंकरराव काळे, दिग्विजय खानविलकर, मदनराव पिसाळ, लक्ष्मणराव हातणकर, वसंत रंगनाथ होशींग, केशवराव पाटील, ओंकार वाघ, दुलाजी पाटील, जनार्दन वळवी, दामूजी तारणेकर, महादू बरोरा, माधव मराठे, शिवाजीराव पाटील, भगवंतराव गायकवाड, भगवतीप्रसाद पांडे, रामचंद्र भोये, नरसिंहराव देशमुख व काकासाहेब देसाई यांच्या निधनाबद्दल विधानसभेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोकप्रस्ताव मांडला.
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, बांधकाम मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री नारायण राणे, हर्षवर्धन पाटील, सेनेचे नेते सुभाष देसाई, मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर, भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, शिवाजीराव पाटील निलंगेकर, पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे, मधुकर पिचड, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, रवींद्र वायकर, बच्चू कडू, शशिकांत शिंदे, चंद्रदीप नरके, आशिष जयस्वाल, बसवराज पाटील, पंकजा मुंडे, मधुकरराव चव्हाण, एकनाथ शिंदे, प्रवीण दरेकर, के.पी. पाटील, प्रभाकर भालेराव, विजयराज शिंदे, सुशील शिंदे, सचिन अहीर, गुलाबराव देवकर यांनी दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहातील सदस्यांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत नेत्यांना अभिवादन करून शोकप्रस्ताव मंजूर करावा असे आवाहन केले. त्याप्रमाणे सभासदांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विधानसभा अध्यक्षांनी शोकप्रस्ताव संमत झाल्याचे सांगून सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
विधान परिषदेत अजित पवार यांनी शोक प्रस्ताव मांडला. साडेपाच तास अनेक सदस्यांनी भावना व्यक्त केल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व विलासराव देशमुख यांच्याबद्दल सर्वच सदस्य भरभरून बोलले. त्यांच्या अनेक आठवणी सांगताना अनेकांना गहिवरून आले. विलासरावांनी अखेपर्यंत मैत्री कायम ठेवली, असे शेकापचे जयंत पाटील म्हणाले.
प्रामाणिक कार्यकर्ता, मग तो कुठल्याही जातीचा असो सत्ता मिळाली नाही तरी चालेल त्याला उमेदवारी दिली पाहिजे, असा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचा आग्रह होता, असे भास्कर जाधव म्हणाले. भाऊसाहेब फुंडकर म्हणाले, बाळासाहेब ठाकरे युतीचे कुटुंबप्रमुख होते. असे नेतृत्व पुन्हा होणे नाही. विलासराव देशमुख काँग्रेसचे सच्चे व कर्मठ नेते होते. सावकारी प्रकरणानंतरही त्यांनी कटुता येऊ दिली नाही. दिलखुलास व दिलदार माणूस गेला. दिवाकर रावते, निरंजन डावखरे, भाई जगताप, किरण पावसकर, डॉ. दीपक सावंत, राम पंडागळे, जयप्रकाश छाजेड, डॉ. नीलम गोऱ्हे, सुरेश नवले आदी अनेक सदस्यांनीही त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
शोकप्रस्तावाला मंजुरी देऊन पहिल्या दिवशीचे कामकाज स्थगित
विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत २४ नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करून शोक प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यानंतर कामकाज स्थगित करण्यात आले. माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,
First published on: 11-12-2012 at 04:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sad motion sanctioned and rest of first day work postponded