Sada Sarvankar : “हिंदू मत विभाजनामुळे…”, माहीममधील पराभव स्वीकारत सदा सरवणकरांचा मोठा दावा!

माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांचे वर्चस्व होते. परंतु, येथून उमेदवार उभा करू नये म्हणून महायुतीमध्ये चढाओढ सुरू होती.

sada sarvankar reaction Mahim vidhansabha Constituency 2024
माहीम विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Sada Sarvankar on Mahim Vidhan Sabha Constituency : विधानसभा निवडणुकीत माहीम विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांच्या बंडखोर भूमिकेमुळे हा मतदारसंघ चर्चेत राहिला. परंतु, या दोघांच्या चर्चेत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे महेश सावंत यांनी जागा बळकावली. यावरून सदा सरवणकर यांनी पराभव स्वीकारत मतदारांसाठी एक्स पोस्ट केली आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर यांचे वर्चस्व होते. परंतु, येथून उमेदवार उभा करू नये म्हणून महायुतीमध्ये चढाओढ सुरू होती. लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपाला बिनशर्थ पाठिंबा दिला होता. त्या उपकारांची परतफेड म्हणून महाराष्ट्र आणि मुंबईतील काही जागांवर भाजपाने मनसेला जाहीर पाठिंबा दिला होता. हाच पाठिंबा माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरेंनाही मिळावा याकरता महायुतीमध्ये खलबतं सुरू होती. परंतु, सदा सरवणकर येथून निवडणूक लढवण्यावर ठाम होते. आशिष शेलारांपासून नारायण राणेंपर्यंत सर्वांनीच सदा सरवणकरांनी ही जागा सोडावी याकरता प्रयत्न केले. परंतु, सदा सरवणकरांनी या जागेवरून निवडणूक लढवलीच. त्याकरता त्यांनी अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरला अन् दारोदारी जाऊन मतदारांशी संवाद साधला.

हेही वाचा >> Mahim Constituency : सरवणकरांच्या खिशावरील धनुष्यबाण चिन्ह पाहताच अमित ठाकरेंनी केलेली कृती चर्चेत; सिद्धिविनायक मंदिरात आले आमने-सामने!

त्यामुळे एकूणच प्रचार मिरवणुकीत सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे असंच चित्र निर्माण झालं होतं. परंतु, निकालाच्या दिवशी महेश सावंत यांनी बाजी मारली आणि सदा सरवणकर व अमित ठाकरेंचा दारुण पराभव झाला. यावरून सदा सरवणकरांनी हिंदू मतविभाजनावर ठपका ठेवला आहे. “मी तुमच्यासाठी काम केलं, मी निवडणूक लढलो पण लोकशाहीमध्ये जनमताचा कौल हा सर्वोच्च असतो. जनतेने दिलेला हा कौल मला मान्य आहे. त्याचा मी आदर करतो. महायुतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम करूनही माझ्यावर आपण विश्वास ठेवून मला ४८,८९७ मतदार यांनी मतदान केले”, असं म्हणत सदा सरवणकरांनी सर्वांचे आभार मानले.

“हिंदू मत विभाजनामुळे फक्त १३१६ मतांनी माझा पराभव झाला. माझ्या निवडणूक प्रचारात मला साथ देणारे महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा मी कायम ऋणी राहीन. या मतदारसंघातील जनतेने तीन वेळा माझ्यावर विश्वास दाखवून मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली, हे मी माझं भाग्य समजतो. जनतेच्या या कौलानंतर त्यांच्या सेवेत कोणताही खंड पडू देणार नाही, हा मी शब्द देतो. माझ्यावर कायम विश्वास ठेवणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार…”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sada sarvankar on mahim vidhan sabha constituency lost maharashtra assembly election 2024 sgk

First published on: 25-11-2024 at 00:43 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या