साखर कारखानदार व साठेबाज व्यापाऱ्यांमधील संगनमतामुळेच बाजारपेठेत साखरेचे भाव कमी होतात. परिणामी शेतकऱ्यांच्या उसाला कमी दर मिळतो, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी येथे केला.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते जिल्ह्य़ात आले होते. बदनापूर, अंबड व घनसावंगी तालुक्यातील काही आदपग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी त्यांनी घेतल्या. वडीगोद्री येथे वार्ताहरांशी बोलताना खोत म्हणाले की, साखरसम्राट व साठेबाजी करणारे सट्टेबाजार व्यापारी यांचे महाराष्ट्रात संगनमत आहे. ते संगनमतानेच साखरेचे भाव पाडतात. नंतर बाजारपेठेत अधिक भावाने विक्रीच्या प्रयत्नात राहतात. खरेदीनंतरही व्यापाऱ्यांची साखर कारखान्यांच्या गोदामामध्ये वर्ष-सहा महिने पडून असते. कमी भावाच्या निविदा स्वीकृत झाल्याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या उसालाही कमी भाव मिळतो. उसाचा भाव व रिकव्हरीसंदर्भात साखर कारखान्यांबाबत संशय घेण्यासारखी स्थिती आहे. साखर विक्रीच्या निविदा ऑनलाईन केल्या पाहिजेत. साखर उतारा तपासणीसाठी नवीन तंत्रज्ञानही आले आहे. त्याकडे साखर कारखानदार मात्र लक्ष देण्यास तयार नाहीत. पश्चिम महाराष्ट्रात असलेला ऊसतोडणी व वाहतुकीचा खर्च प्रतिटन ४०० ते ५०० रुपये असताना तोच खर्च जालना जिल्ह्य़ात मात्र ६०० ते ७०० रुपये कसा, असा सवाल खोत यांनी उपस्थित केला.
दिलासा यात्रेचा उद्या नांदेडात समारोप
राज्यातील फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेईल. परंतु त्यासाठी काही वेळ द्यावा लागेल. शेतकरी हिताचे निर्णय न झाल्यास सरकारमध्ये राहण्यात आम्हाला स्वारस्य असणार नाही, असेही खोत यांनी स्पष्ट केले. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक गावातील जलस्रोत बळकटीकरणाकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी खोत यांनी बुलडाणा जिल्ह्य़ातील चांडोळ येथून १६ डिसेंबरपासून दिलासा यात्रा सुरू केली असून तिचा समारोप रविवारी (दि. २१) नांदेड जिल्ह्य़ातील काकांडी येथे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा