Sadabhau Khot Apologise To Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आरोप-प्रत्यारोपांना उत आलाय. यामुळे निवडणुकीच्या प्रचारांना रंग चढत जातोय. महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही बाजूंचं जागावाटप उमेदवारी अर्ज माघारीनंतर स्पष्ट झालं आहे. कोण कुठून कुणाविरोधात निवडणूक लढवत आहे तेही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता जोरदार प्रचार व त्यानिमित्ताने होणारे आरोप-प्रत्यारोप चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रसंगी या आरोपांना चिखलफेकीचंही रुप येत असल्याचं दिसत आहे. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबाबत केलेलं विधान त्यामुळेच चर्चेत आलं. सदाभाऊ खोत यांच्यावर सर्वत्र टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी सारवासारव केली आहे. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदाभाऊ खोत म्हणाले, “मला कोणाच्याही आजारापणावर, व्यंगावर बोलायचं नव्हतं. मी केलेल्या भाष्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. मला राजकीय आणि सामाजिक चेहऱ्यावर बोलायचं होतं. ५० वर्षांच्या कालखंडात शेतकरी आणि गावगड्यांची होरपळ झाली, त्यामुळे विस्थापितांविरोधात आम्ही ४० वर्षे लढत आहोत. लाठ्याकाठ्या खात आहोत, अनेकांनी प्राणांची आहुती दिली आहे. आमचा लढा न्याय मिळवण्याकरता होता. त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही तोवर आमचा आवाज बुलंद असेल.”

हेही वाचा >> “त्या विधानानंतर मी सदाभाऊ खोतांना फोन केला आणि…”, अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…

सदाभाऊ खोत शरद पवारांवर टीका करत होते तेव्हा देवेंद्र फडणवीस व्यासपीठावर बसून हसत होते, अशी टीकाही केली जातेय. यावर सदाभाऊ खोत म्हणाले, “काही लोकांना आपल्यावर ओढावून घ्यायचं असतं. त्यातून आपल्याला काही राजकीय लाभ मिळेल का, हे पाहिलं जातं. लोकांच्या भावनेला कसा हात घालता येईल, अशापद्धतीने कटकारस्थान लोकसभेला खेळलं गेलं, आताही तेच सुरू आहे.”

आता त्यांचा शेवटचा प्रयत्न सुरू आहे

“गावगाड्याकडे काही शब्द असतात. आभाळाकडे पाहून…पुढे मला काही बोलायचं नाही. पण मी असं बोललो असतो तर मी व्यक्तिगत पातळीवर आलो असं बोलले असते. पण गावगाडा लुटला आणि या निवडणुकीत पुन्हा लुटायला आला पाहिजे, म्हणून त्यांचा आता शेवटचा प्रयत्न सुरू आहे, असं मी म्हणालो”, असंही स्पष्टीकरण सदाभाऊ खोतांनी दिली.

“:जयंत पाटलांनी आमच्यावर पोस्ट टाकली आहे. ज्यावेळी मला तुमच्या गुंडांनी फोडून काढलं तेव्हा तुमच्याकडे हृदय होतं की नाही? तुम्ही पक्ष चालवता की गुंडाची टोळी चालवता? गरीब माणसांना येऊन मारलं तर गरीब माणसाने येऊन बोलायचं नाही का? मग आता तुम्हाला वाईट का वाटायला लागलं?”, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadabhau khot apologize to sharad pawar over derogatory statement sgk