शेतकऱ्यांचा वापर केवळ गुलाम म्हणून केला जात आहे. शेती मालाचे दर नोकरशहा व राजकारण्यांनी परस्परच ठरवून शेतकऱ्याला पिळून खाल्ले आहे. कष्ट केवळ शेतकऱ्यांने करायचे अन् त्याच्या कष्टावर इतरांनी मजा मारायची हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केला.
स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब ऊर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त पाटण येथे आयोजित साहित्य संमेलनातील व्याख्यानात ते बोलत होते. भाई पंजाबराव चव्हाण, रावसाहेब पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, बाळासाहेब खबाले-पाटील यांची उपस्थिती होती. सदाभाऊ खोत म्हणाले, की प्रस्थापित समाज व्यवस्थेबाबत शिकलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना खंत वाटत नाही. मिळालेल्या ज्ञानावर पिचलेल्या शेतकरी बापाला बळ देण्यासाठी मला जगाबरोबर धावायचे आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. स्वातंत्र्यसैनिक बाळासाहेब ऊर्फ भडकबाबा पाटणकर हे चळवळीतून तयार झालेले क्रांतिकारक होते. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या चळवळीतून सहभाग घेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठविला. जिल्हाधिकारी, शिक्षक व प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी शेळी पालन, म्हैस पालन व कुक्कुटपालन असे जोडधंदे करून पाहावे. त्या वेळी त्यांना शेतकऱ्याची खरी व्यथा कळल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांवर गाणी लिहिणारे व चित्रपट काढणारे मोठे झाले. मात्र शेतकरी मरणाच्या दारात उभा असलेला पाहावयास मिळतो. शेतकऱ्याला सन्मान न दिल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे. कायद्याच्या कचाटय़ात शेतीमालाला कवडीमोलाने भाव मिळतो. यामुळे हे सर्व घडत आहे. वसाहतवादी प्रवृत्तीमुळे शेतकऱ्याचा मुलगा नोकरीला नसेल, तर त्याचा विवाह होत नाही. शिकलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाला खंत वाटत नाही ही शोकांतिका आहे. भाई पंजाबराव चव्हाण, रावसाहेब पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले.