कराड : शरद पवार लढाऊ नव्हेतर पाठीत खंजीर खुपसणारे सेनापती. त्यांनीच मराठा समाजाची माती केल्याची जहरी टीका रयत क्रांती संघटनेचे प्रमुख तथा राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी साताऱ्यात बोलताना केली. पवारांनी आता थांबावे, आणि आम्ही मराठे त्याची वाट बघत असल्याचे खोत म्हणाले.
सध्या मराठा आरक्षण प्रश्नावरून सामाजिक आणि राजकीय वातावरण सर्वदूर तापले असताना, याच मुद्द्यावरून सदाभाऊंनी खासदार शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवल्याने पवार समर्थक नेते आणि सदाभाऊंमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. राज्यातील आघाडी सरकारची सत्ता देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता उलथवून टाकली. त्यामुळे शरद पवार आज एका ब्राह्मण नेतृत्वावर मराठा आरक्षणाचे खापर फोडत आहेत अशी टीकाही सदाभाऊंनी केली.
हेही वाचा >>> “मनोज जरांगेंची ‘ती’ मागणी चुकीची”, ओबीसी महापंचायतीकडून महामोर्चाचा इशारा
मराठा समाजाला आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्टपणे सांगणारा सन २००४ मधील बापट आयोग का स्वीकारला? पुढे गायकवाड आयोगाने मराठा समाज मागास असल्याचे पुरावे गोळा केले आणि त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळाले. पण, राज्यातील आघाडी सरकारच्या काळात शरद पवारांनीच जाणीवपूर्वक मराठा समाजाचे आरक्षण घालवले असा सरळसोट आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. मराठा समाजाची माती करणाऱ्या पवारांनी हे पाप फेडण्यासाठी आता आझाद मैदानात उपोषण करावे असा टोला त्यांनी लगावला.