कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस परिषद घेण्यात आली. या परिषदेत संघटनेतून हकालपट्टी झालेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोल्हापूरचे जिल्हा अध्यक्ष जालंदर पाटील यांनी सदाभाऊ खोत यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. ज्या राजू शेट्टींना तुम्ही फसवलेत त्यांच्यामुळेच  तुमच्या अंगावर कपडे आले आहेत, लोक तुम्हाला ओळखू लागले  हे  विसरू नका. संघटनेच्या गळ्याला खोतांनी नख लावले, मात्र शेतकरी तुम्हाला माफ करणार नाहीत हे लक्षात ठेवा असाही टोला पाटील यांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या आयुष्यात माती कालवण्याचा प्रयत्न सदाभाऊ खोत यांनी केला. २०१९ च्या निवडणुका लांब नाहीत या निवडणुकांमध्ये जनता तुम्हाला मातीत मिसळल्याशिवाय राहणार नाही असेही जालंदर पाटील यांनी म्हटले. एवढेच नाही तर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही शेतकऱ्यांच्या आयुष्यात विष कालवण्याचे काम केल्याचा आरोप पाटील यांनी केला. या सगळ्यांना आता जनताच जागा दाखवेल. इतके दिवस सदाभाऊ खोत स्वतःला गरीब म्हणवत होते मग त्यांच्याकडे बंगला आणि कार कुठून आली असाही प्रश्न पाटील यांनी विचारला. आज झालेल्या ऊस परिषदेत केंद्र आणि राज्य सरकारपेक्षाही सदाभाऊ खोत यांनाच टीकेचे लक्ष्य करण्यात आले.

बारामतीचे शेतकरी कृती समितीचे सदस्य सतीश काकडे यांनीही सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली. सदाभाऊ खोत हा माणूस घरात घ्यायच्या लायकीचा नाही. त्यांची परिस्थिती चांगली नव्हती तेव्हा मी त्यांना पाच लाख रूपये दिले होते आज मंत्री झाल्यावर त्यांची मती बदलली. शेट्टी यांनी त्यांना मोठे केले पण त्यांनाही विसरले अशी जाणीवही काकडे यांनी करून दिली.

Story img Loader