पश्चिम महाराष्ट्राला घराणेशाहीने ग्रासले असून, येथे वतनदारांचे राज्य आहे. तब्बल ५० वर्षे सत्ता झाली तरी यांना पुन्हा जनतेची सेवा करण्यासाठी नव्हे तर मेवा खाण्यासाठी सत्ता हवी आहे. पिढय़ानपिढय़ा सत्तेची अभिलाषा राहिल्याने सर्वसामान्यांना संधी कधी मिळणार अशी जळजळीत टीका करून, आता या वतनदारांना पंढरपूरला सेवेकरी म्हणून पाठवूया असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केले.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संभाव्य उमेदवार मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, ज्येष्ठ नेते भीमरावदादा घोरपडे, जिल्हा परिषद सदस्या मंगलताई घोरपडे, हिंदुराव चवरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष हणमंतराव चवरे, ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, संग्रामसिंह घोरपडे, शंकर शिंदे, संजय भगत यांची उपस्थिती होती.
खोत म्हणाले की, जनतेने देशात परिवर्तन घडवून आणले. आता काही दिवसात विधानसभा निवडणुका होत आहेत. कराड उत्तरमधून दूरदृष्टी असलेले व जनतेसाठी झटणारे मनोजदादा घोरपडे यांनी प्रस्थापितांविरुद्ध लढण्यास प्रारंभ केला आहे. त्यांच्यासाठी महायुतीकडून ही जागा मिळावी म्हणून आपण पुढाकार घेणार आहे. उत्तरमधील जनतेला घोरपडे यांच्या रूपाने सर्वसामान्य नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे कराड उत्तरमध्ये परिवर्तन अटळ असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवाजीराव नाईक म्हणाले की, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने आता मनोजदादा घोरपडे यांच्यासारख्या उमदय़ा नेतृत्वाला वाव द्यावा. त्यांना राजकीय बळ देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य समजून काम केल्यास ऊस उत्पादक शेतक-यांसह सर्वसामान्य जनतेला २४ तास काम करणारा प्रतिनिधी मिळेल.
मनोज घोरपडे म्हणाले की, शेतकऱ्यांना कारखान्याचा चांगला हमीभाव मिळविण्यासाठी व गेली अनेक वर्षे या मतदारसंघाच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जनतेच्या आग्रहाखातर विधानसभा निवडणुकीत शड्डू ठोकणार आहे. ऊस उत्पादकांच्या प्रश्नासह शेतक-यांच्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करणार आहे. यापूर्वीही आपण शेतक-यांच्या प्रश्नी लढा दिला आहे. आतापर्यंत कोणताही गट, तट न पाहता ९९ टक्के समाजकारण केले आहे. प्रास्ताविक राजेंद्र घोरपडे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा