‘वाळव्याचे पार्सल’ म्हणून आपणास उपरे संबोधून गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी टीकास्त्र सोडल्याबद्दल माढा लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाशिव खोत यांनी आर. आर. पाटील यांची हिंदुस्थान ही जहागिरी नाही. मावळ येथे पाणी मागणा-या शेतक-यांवर गोळीबार करणारे आर. आर. यांचे हात रक्ताने माखलेले आहेत, असा प्रत्यारोप केला.
माढा लोकसभेसाठी उमदेवारी अर्ज भरण्यापूर्वी सोलापूर श्रमिक पत्रकार संघात खोत यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. त्योवेळी बोलताना त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा समाचार घेतला. सांगली जिल्हय़ातील तासगावचा साखर कारखाना त्यांनीच ‘हुतात्मा’ केला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले. राष्ट्रवादी काँग्रेस हीच गुंडांची टोळी असल्याची टीका खोत यांनी केली. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस संजय पाटील-घाटणेकर, रिपाइंचे राजा सरवदे, काँग्रेसमधून महायुतीत दाखल झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत देशमुख तसेच सोलापूर जिल्हा जनसेवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.
आपली उमेदवारी ही शेतकरी, शेतमजूर, दीनदलितांसाठी असून माढय़ातून निवडून आल्यास येथील टेंभू, म्हैसाळ, कुकडी, सीना-माढा यांसारख्या अर्धवट उपसा सिंचन योजना मार्गी लावून दुष्काळी भागात पाणी आणू, उजनी धरणातील पाण्याचे समान वाटप करू, कुर्डूवाडी येथील रेल्वे वर्कशॉपचा प्रश्नही मार्गी लावू, अशी ग्वाही देताना खोत यांनी त्यासाठी रस्त्यावर व लोकसभेत संघर्ष करण्याचा निर्धार केला. तसेच धनगर, मराठा, यलमार या समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नासह दलित व मुस्लिमांच्या विकासाचे प्रश्न सोडविण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.
माढय़ात मला व हातकणंगलेत खासदार राजू शेट्टी यांना पराभूत करण्यासाठी धनदांडग्यांनी व मातब्बर नेत्यांनी कंबर कसली आहे. परंतु सामान्य दीनदुबळय़ांची शक्ती आपल्या पाठीशी असल्यामुळे काळजी नाही, असेही त्यांनी नमूद केले. धुळे येथील दूध प्रकल्प घोटाळय़ाच्या चौकशीकामी आपली ‘नार्को चाचणी’ घ्यावी. यात एक रुपया घेतल्याचे सिद्ध झाल्यास आपण राजकारण सोडून द्यायला तयार आहोत, असे आव्हानही त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा