शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियान सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर नामांतर करायची गरज काय? आहेच ते संभाजीनगर म्हटल्याने औरगांबादच्या नामांतराचा वाद पुन्हा सुरु झाला आहे. यावर प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘संभाजीनगर’चा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच आता रयत क्रांती संघटनेचे नेते, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आटपाडी शेतकरी मेळाव्यात खोत बोलत होते.
“हे राज्य जनतेसाठी तर जनतेला लुटण्यासाठी चालवले जात आहे. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काही कळत नाही. परवा ते औरंगाबादाचे नाव कशाला बदलायचे मी म्हणतो आहे ना संभाजीनगर असं म्हणाले. तुम्ही म्हणत आहात म्हणून संभाजीनगर? मग एखाद्याला मूलबाळ होत नसेल त्याला बोलवा आणि म्हणा मी म्हणतो आहे ना की हा बंड्या तुमचाच आहे. हे असे असेल तर राज्ये कसे चालेल. राज्य चालवायचे असेल तर सामान्य माणसाला सन्मान द्यावा लागेल,” असे सदाभाऊ खोत म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
“संभाजीनगर नामांतर करायची गरज काय ? आहेच तेे संभाजीनगर. नामांतर करायची गरजच काय आहे. ओवेसी येऊन गेला. तिथे औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवलं. यांच्या ए टीम बी टीम पाठवल्या जात आहे. कुणाच्या हातात भोंगा द्यायचा, कुणाच्या हातात हनुमान चालीसा देणार आणि हे मजा बघत बसणार आहे. आम्ही मग काय टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेण्यासाठी बसलो आहोत का?,” असा टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला होता.
औरंगाबादचे नामांतर करणे आमच्या सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही – राजेश टोपे
राज ठाकरेंची टीका
“उद्धव ठाकरेंनी मला एक गोष्ट सांगावी की तुमच्या अंगावर आंदोलन केल्याचा एक गुन्हा तरी आहे का. परवा दिवशी संभाजीनगरचे नामांतर झाले काय आणि नाही काय, मी बोलतो आहे ना असे म्हणाले. पण तुम्ही कोण आहात? तुम्ही वल्लभ भाई पटेल की महात्मा गांधी आहात? तुम्ही बोलताय त्याला काही तर्क आहे का? संभाजीनगरचा प्रश्न निवडणुकीच्या दृष्टीकोनातून सतत जिवंत ठेवायचा आहे आणि त्यावरुन मते मिळवायची आहेत. संभाजीनगर झाले तर बोलायचे कशावर? शहरांमध्ये १०-१० दिवस पाणी येत नाहीये. ते विषयच नाहीत,” असे राज ठाकरे पुण्यातील सभेत म्हणाले होते.