गोपीनाथ मुंडे असते तर जागावाटपासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अशी कुत्तरओढ झाली नसती, असे म्हणण्याची वेळ आली आहे, या शब्दात सदाभाऊ खोत यांनी महायुतीतील जागावाटपावर नाराजी व्यक्त केली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत ३८ जागांची यादी दिली असली, तरी चर्चेत १२-१३ जागा मिळाल्या तरी समाधानी राहिलो असतो. मात्र, कोणी चर्चा करायलाच तयार नाही आणि आमच्यामुळे महायुतीच्या जागावाटपात पेच निर्माण झाला आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे. ते चुकीचे असल्याचे खोत यांनी औरंगाबाद येथे सांगितले.
मराठवाडा व विदर्भातून प्रत्येकी दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी होती. मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना व नांदेड जिल्ह्य़ांत मिळून दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्याव्यात, ही अपेक्षा करणे चूक कसे असेल? पश्चिम महाराष्ट्रात ९ जागांवर आम्ही दावा केला. पण कोणी चर्चा करीत नाही. महायुतीत आम्ही नको असेल तर तसे कळवावे म्हणजे अधिक बरे होईल, या शब्दांत खोत यांनी भाजपच्या नेत्यांना फटकारले.
एकही जागा देणार नाही, नुसता पाठिंबा द्या, असे म्हटले असते तरी त्याचा विचार करता आला असता. मात्र, चर्चाच होत नाही असे सांगत खोत म्हणाले की, ग्रामीण भागाची नाळ माहीत असणारा मुंडे यांच्यासारखा नेता आज असता तर महायुतीत आमची एवढी फरपट झाली नसती. आम्ही चळवळीत वाढलो आहोत. प्रश्न घेऊन लढतो आहोत. त्यामुळे तुम्ही आम्हाला नकोत, असे स्पष्टपणे सांगा. म्हणजे निर्णय घेणे सोयीचे होईल, असेही ते म्हणाले.
३८ जागांची यादी महायुतीच्या नेत्यांकडे दिली. याचा अर्थ या सगळ्या जागा आम्हाला द्या, असा होत नाही. किमान त्यावर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा चूक कशी असेल. जागावाटपाचा तिढा वेगळीकडेच असल्याचे खोत सांगतात. काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले की, तेथे घटक पक्षांना जागा सोडायच्या, असा विचार आहे. वर्षांनुवर्षे प्रबळ दावेदार असणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर घटक पक्षातील उमेदवारांना पुढे ढकलायचे का, असाही विचार केला जात आहे. एखाद्या जागेवर घटक पक्षाने दावा केला की, तेथे आम्ही नवा माणूस घेतला आहे, असेही सांगितले जात आहे. त्यामुळे छोटय़ा पक्षांची महायुतीत अडचण होत असल्याची माहिती खोत यांनी दिली.

Story img Loader