राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास आठ महिने उलटली आहेत. तरीही राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त लागत नाहीये. यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाकडून मंत्रीमंडळ विस्ताराची दररोज नवीन तारीख दिली जात आहे. या सर्व घडामोडीनंतर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मंत्रीमंडळ विस्तार न होण्याला अजित पवार कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
अजित पवार यांच्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होत नाही, असं विधान सदाभाऊ खोत यांनी केलं. ते सोलापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्यामुळे अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत विचारलं असता, सदाभाऊ खोत यांनी अजित पवारांनाच कारणीभूत ठरवलं आहे.
हेही वाचा- “…तेव्हा नरेंद्र मोदींना माझ्या वडिलांनी वाचवलं”, उद्धव ठाकरेंनी करून दिली वाईट काळातील आठवण
संबंधित प्रश्नाला उत्तर देताना सदाभाऊ खोत म्हणाले की, अजित पवारांमुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. कारण त्यांचा मुहूर्त अजून ठरत नाही. “शपथविधी कधी घ्यायचा? हे नक्की झालं की मंत्रिमंडळाचा विस्तार होईल,” असा टोला खोत यांनी लगावला.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या पुस्तकात अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांचं कौतुक केलं आहे. आता तेच अदाणींविरोधात आंदोलन करत आहेत. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या पुस्तकात दोन शब्दही लिहिले नाही, अशी टीका खोत यांनी केली.