Sadabhau Khot Calls Devendra Fadnavis Arjun: रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत नुकतेच भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यात विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये सदाभाऊ खोत सहभागी झाले असून आता ते विविध ठिकाणी सभांमधून राज्य सरकारची भूमिका मांडत आहेत. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने विरोधकांना लक्ष्यदेखील करत आहेत. रविवारी सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील व्यक्तिरेखांना थेट महाभारतातील उपमा दिल्या.
सांगलीतील कार्यक्रमात बोलताना सदाभाऊ खोत यांनी महाभारतात दोन विरुद्ध बाजूला असणाऱ्या कर्ण व अर्जुनाची उपमा सत्तेत एकत्र असणाऱ्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांना दिल्यामुळे त्यावरून चर्चा सुरू झाली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, “डोकं शांत ठेवायचं. राजकारणात एकच माणूस मोठा आहे. तो म्हणजे आपण स्वत:. राज्यात सत्तापरिवर्तन झालं. महायुतीची सत्ता आली होती. पण शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा. शकुनी मामानं डाव टाकला आणि जनतेनं निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं गेलं”.
“पण फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या साथीनं महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं. एकनाथ शिंदे हे कर्ण आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अर्जुनाची भूमिका देवेंद्र फडणवीस बजावत आहेत”, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
“काय चाललंय हे? असं राजकारण असतं का?”, जयंत पाटील भरसभेत कार्यकर्त्यांवर संतापले; भाषणास नकार
“शिंदे मागेल त्याला दान देतात”
“एकनाथ शिंदे मागेल त्याला दान देतात. हे राज्य कसं चालवायचं याचा दूरदृष्टीपणा कुणाकडे असेल तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. सगळ्यांनी त्यांना घेरलं आहे. शरद पवारांना कळलं की एकच माणूस आपल्याला छातीवर घेऊ शकतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणून सगळे एक झाले. वेगवेगळी आंदोलनं राज्यात उभी केली गेली. १९८२ सालापासून मराठा समाज आरक्षण मागतोय. अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. पण कुणीही आरक्षण दिलं नाही. पण २०१९ मध्ये पहिल्यांदा फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण शरद पवार, उद्धव ठाकरेंनी घालवलं. पण टीका देवेंद्र फडणवीसांवर व्हायला लागल्या”, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली.
“सगळे वाडे, सरदार देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात एक झाले आहेत. मला आमदार आणि मंत्री कुणी केलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी केलं”, असंही खोत म्हणाले.