टोमॅटोच्या किमती दिवसेंदिवस गगनाला भिडत असून सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त ताण पडत आहे. परंतु, दुसरीकडे बऱ्याच वर्षांनी टोमॅटोला भाव मिळाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे टोमॅटोच्या किमती सामान्य नागरिकांच्या अटोक्याबाहेर गेल्या असल्या तरीही यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावरूनच रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांच्यावर खरपूस टीका केली आहे.

“टोमॅटोच्या किमती वाढल्याने सामान्य नागरिकांप्रमाणे आम्हालाही त्रास सहन करावा लागत आहे”, अशी प्रतिक्रिया सुनील शेट्टीने एका कार्यक्रमात दिली होती. त्यावरून रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा >> ‘बाईपण भारी देवा’चे राज ठाकरेंच्या वडिलांशी आहे खास कनेक्शन, केदार शिंदेंनी केला खुलासा, म्हणाले…

“देशात आणि राज्यात टोमॅटोचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रत्येकजण टोमॅटो टोमॅटो करून पागल बनले आहेत. या पागलांमध्ये भर पडली ती सिनेकलावंतांची. सिनेकलावंत हे संवेदनशील असतात. परंतु, काही सिनेकलावंत हे सडक्या डोक्याचे आहेत. सुनील शेट्टी आर्थिकदृष्ट्या गब्बर सिंग आहे तरी त्याला टोमॅटो खायला परवडत नाही. अरे शेतकऱ्याची भूमिका करायची असेल तर कोट्यवधी रुपये घेता. आणि तोच शेतकरी एका बाजूला आत्महत्या करतोय, कधीतरी १०-१२ वर्षांतून चांगला भाव मिळाला की तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या पोटात दुखायला लागतंय”, असा संताप सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.

“सुनील शेट्टी तुम्ही सिनेकलावंत नाही, तुम्ही बाजारू कलावंत आहात. मी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, माय माऊलींना आवाहन करतो की सुनील शेट्टी हा जागतिक भिकारी आहे. हा भिकारी जर तुमच्या दारात कटोरा घेऊन भिक मागायला आला, वाढ गं माई असा आवाज आला तर या सडक्या डोक्याच्या माणसाला सडके टोमॅटो त्याच्या कटोऱ्यामध्ये टाका आणि या जागतिक भिकाऱ्याची भूक भागवा. कारण हा संताप होतो आहे. तुम्ही जेवढे दारू गुटख्यावर पैसे उधळता, सिगरेट ओढायला जेवढा पैसे खर्च करता तर त्यातील काही भाग शेतकऱ्याच्या घरात आला तर त्याच्या लेकरा बाळाचं भविष्य उजळ होईल, याचा विचार करणार नाही का? असंही सदाभाऊ खोत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिनेता श्रमेश बेटकरवरही केली होती टीका

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम श्रमेश बेटकर यानेही टोमॅटोच्या दरावरून इन्स्टाग्राम स्टोरी ठेवली होती. त्यावरूनही सदाभाऊ खोत यांनी त्याचा खरपूस समाचार घेतला होता. “सकाळपासून एकच गोष्ट कळत नाहीये, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत?” अशी इन्स्टाग्राम स्टोरी श्रमेश बेटकर याने ठेवली होती. त्याच्या या स्टोरीवरून सदाभाऊ खोत यांनी टीका केली. ते म्हणाले, “श्रमेश बेटकर हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेला नाही, टोमॅटोचा भाव वाढताच हा त्यावर विनोद करतो, टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवू की बँकेत? टोमॅटो काय फॉरेन करन्सी आहे की त्याला स्विस बँकेत लागेल.. तुला लई टोमॅटोचा जुस आवडतो, टोमॅटो आवडतो तर गावाकडे ये, शेतीत ये, टोमॅटो लाव, निंदायला बस, फवारणी कर, मग तुझी हास्यजत्रा कशी होत्या बघ तुला कळेल.. बिन पाण्याची घेऊन तू नाचायला लागशील.”