स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्त पालन समितीचे अध्यक्ष जालिंदर पाटील यांनी सोमवारी पुण्यात ही घोषणा केली. यामुळे आता रविकांत तुपकर आणि राजू शेट्टी यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दीर्घकाळ सांभाळलेले रविकांत तुपकर यांना संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यामुळे राजू शेट्टी यांच्यावर टीका होत आहे.
रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राजू शेट्टींच्या अहंकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ग्रहण लागल्याची खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.
हेही वाचा : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा मोठे निर्णय; आशा स्वयंसेविकांना १० लाखांचा अपघाती विमा मिळणार
सदाभाऊ खोत काय म्हणाले?
“शेतकरी चळवळ टिकली पाहिजे. हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. मात्र, स्वतःच्या अहंकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ग्रहण लागलं आहे. याचं आत्मपरीक्षण खऱ्या अर्थाने राजू शेट्टी यांनी करायला पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये उल्हासदादा पाटील असतील, मी स्वत: असेल किंवा शिवाजीराव माने, रविकांत तुपकर असतील. अशी मोठी यादी आपल्याला पाहायला मिळेल. हे सर्व कार्यकर्ते घरची भाकर खाऊन घरादारांवर तुळशीपत्र ठेऊन घराच्या बाहेर १० ते १५ वर्ष काम करत राहिले. तरीही अशा माणसांना अपमानित करणं योग्य नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाने अजूनही विचार करावा आणि शेतकऱ्यांसाठीची ही चळवळ एकत्र कशी राहील, यासाठी प्रयत्न करावा”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
रविकांत तुपकरांची पुढची भूमिका काय?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता रविकांत तुपकर यांनी त्यांची पुढची भूमिका काय असेल? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. मात्र, राज्यात नवीन राजकीय आघाडी तयार करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असल्याचं बोललं जात आहे. याच दृष्टीने तुपकर यांची येत्या २४ जुलै रोजी पुणे येथे महत्त्वाची राज्यस्तरीय बैठक होत आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकांवर चर्चा होणार असून महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने समविचारी राजकीय पक्ष, संघटना यांची मोट बांधून तिसरी आघाडी तयार करण्याचे प्रयत्न तुपकर यांनी चालविले आहे.