रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. आपण अनावधानाने ते बोलून गेलो, असंही सदाभाऊ खोत नंतर म्हणाले होते. मात्र, त्यावरून दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे चालू असतानाच आता सदाभाऊ खोत यांनी त्यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. “तुम्हाला काय करायचं ते करा”, असं आव्हानच आता सदाभाऊ खोत यांनी दिल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून याला काय उत्तर दिलं जातं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?

“पूर्वी बापाने केलेलं पाप मुलाला फेडावं लागत होतं. पण, कलयुगात जो पाप करतो, त्याला फेडावं लागते. शरद पवार यांना हे पाप फेडावं लागणार आहे. भविष्यात हा सैतान गावगाड्यापर्यंत परत येता कामा नये”, असं विधान सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना केलं होतं.

दरम्यान, या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी बोलताना त्यावर सविस्तर भूमिका मांडली आहे. “मी काल बोलताना गावगाड्याची जी भाषा आहे ती बोललो. त्याचा शुद्ध उच्चार काय असावा, हे कळण्याइतकी शाळा मी काही शिकलो नाही. एवढा काही अभ्यास मी केला नाही. पण मी हे का बोललो, यामागची भूमिका जाणून घ्यावी लागेल”, असं खोत म्हणाले.

“शरद पवारांच्या पुण्याईनं वतनदाऱ्या पुन्हा निर्माण झाल्या”

“स्वातंत्र्यानंतर पहिल्या फेजमध्ये शरद पवारांचा अवतार झाला पृथ्वीतलावर. १९७८ साली वसंतदादांचं सरकार पाडलं आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला जातीपातीचं, घराणेशाहीचं वळण मिळालं. शिवाजी महाराजांनी प्रस्थापितांच्या वतनदाऱ्या नष्ट केल्या होत्या. त्या वतनदाऱ्या निर्माण होण्याची सुरुवात शरद पवारांच्या पुण्याईनं सुरू झालं. त्याचे परिणाम आज आमचा गावगाडा भोगत आहे. गावातल्या सगळ्या व्यवस्था यांच्या ताब्यात आहेत”, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली; म्हणाले, “भविष्यात हा सैतान…”

“..म्हणून शरद पवारांचे पाय रक्तबंबाळ झाले आहेत”

“शरद पवारांनी शेतकऱ्याला बरोबर घेतलं नाही, फक्त शेतकऱ्याचं नाव बरोबर घेतलं. शेतकऱ्याचं खळं लुटण्याचं काम शरद पवारांनी केलं. शरद पवारांनी फक्त काटे-कुटे पेरले. आता त्या काट्यांवरून चालण्याची वेळ शरद पवारांवर आली आहे. त्यामुळे त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले आहेत. आम्ही खरं बोललो म्हणून बऱ्याच जणांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. तुम्ही त्यांच्या पत्रावळीवर पंगतीला बसले असाल. तुमच्या ओठाला त्यांचं अन्न लागलं असेल. आम्ही आमच्या बापाचं खात होतो. त्याामुळे त्याच्यावर झालेल्या अन्यायाची आमच्या मनात चीड का असू नये? आम्ही आमच्या बापाच्या बाजूने बोलत राहणार”, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

“राजकारण गेलं चुलीत, तुम्ही…”

“आमचं काय तुम्ही वाईट करणार? राजकारणातून उठवणार? राजकारण हा आमचा धंदाच नाही. राजकारणात आम्ही गावगाड्यासाठी आलो. राजकारण गेलं चुलीत. तुम्ही काय वाईट करणार आहात? जे काही करायचं असेल ते करा. नंगे को खुदा भी डरता है. हम भी नंगे है. तुम कितने नंगे है ये हम भी दिखा देंगे. आमच्याकडेही मोठ्या पोथ्या आहेत. बघू, समोरून जरा सवाल-जबाब होईल, तेव्हा योग्य वेळी उत्तर देऊ”, असं खुलं आव्हानच सदाभाऊ खोत यांनी दिलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sadabhau khot slams sharad pawar on saitan statement pmw