राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अलीकडेच सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली होती. सदाभाऊ खोत यांनी राजकारणातून सन्यास घ्यावा, त्यांनी विश्रांती घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला होता. याबाबत विचारलं असता सदाभाऊ खोत यांनी मिटकरींवर पलटवार केला आहे. त्यांनी म्हटलं की, अमोल मिटकरी चांगले वक्ते आहेत. ते वक्तृत्वाच्या जोरावर विधानपरिषेत आले आहेत. मी देखील वक्ता म्हणूनच विधान परिषदेत आलो. पण वक्तृत्व करताना मी कहाण्या सांगून विधानपरिषदेवर आलो नाही.
सामान्य जनतेच्या प्रश्नांवरती मी जीभेची तलवार चालवली आणि वास्तव काय आहे, हे मी मांडलं. वास्तवाशी लढत-लढत मी विधान परिषदेवर आलो. अमोल मिटकरी वास्तवाशी लढत विधान परिषदेवर आले नाहीत. इतिहास काय होता? याचा त्यांनी बाजार मांडला. याच बाजारातल्या शिदोरीवरती ते विधान परिषदेवर आले. त्यामुळे मी इतिहास विकून याठिकाणी आलो नाही, तर इतिहास शिकून येथे आलो आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी अमोल मिटकरींवर टीकास्त्र सोडलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी त्यांनी कांदा प्रश्नावरून राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांच्यावर देखील टीका केली आहे. कृषीमंत्री हे राज्याचे नाहीत, ते फक्त मालेगाव मतदार संघाचे आहेत. त्यांनी कृषी महाविद्यालय मालेगावमध्ये नेलं. पोखरा योजना फक्त मालेगावपुरती मर्यादीत ठेवली, कांदा चाळी मालेगावला नेल्या. राज्याचे कृषीमंत्री हे प्रायव्हेट कंपनी पद्धतीने काम करत आहेत. सोयाबीनच्या दराबाबत त्यांना काही देणं घेणं नाही, त्यांना फक्त बीयाणे कंपन्या सांभाळण्यामध्ये रस आहे.
गेल्या वर्षभरात साडेपाच लाख शेतकऱ्यांनी सोयाबीन खराब लागलं म्हणून तक्रारी केल्या, पण त्यांना एक रुपयाही आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे राज्याला कृषीमंत्रीच नाहीत, असं मी समजतो, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी दादाजी भुसे यांच्यावर टीका केली आहे.