भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला आठ दिवस उलटून गेले आहेत. या घटनेतले आरोपी अद्यापही सापडलेले नाही. मात्र या घटनेचा निषेध करत औरंगाबाद शहरात डाव्या, दलित आणि मराठा संघटनांच्या वतीने मूक सद्भावना रॅली काढण्यात आली. शिवराय ते भीमराय असा बॅनर या रॅलीत लावण्यात आला होता. औरंगाबाद शहरातील क्रांती चौक भागात असलेल्या शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रॅली सुरु झाली. तर भडकल गेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप करण्यात आला. दलित, मराठा, ओबीसी आणि मुस्लिम समाजातील बांधव या रॅलीत सहभागी झाले होते.

भीमा कोरेगावच्या दंगलीचे मुख्य सूत्रधार संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे आहेत. त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. कोरेगावमध्ये लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी येणार आहेत अशी माहिती प्रशासनाला होती. तरीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली नाही. असेही आरोप यावेळी आंदोलकांनी केले. तर भिडे आणि एकबोटे या दोघांनाही अभय देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

Story img Loader