नाटक, चित्रपट असो किंवा दूरदर्शन मालिका यामध्ये काम करणारे कलाकार हे त्यांच्या नकळत आपल्या घरातलेच होत असतात. त्यामुळे त्यांची सुख-दु:ख ही आपली होऊन जातात. आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली नाही. पण, सरतेशेवटी त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे माझ्या कुटुंबातील मंडळी गमावल्याचे दु:ख झाले, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी व्यक्त केली.
हा अपघातच विचित्र आहे. आनंदची कारकीर्द मोठी आहे. पण, अक्षयची आता कुठे सुरुवात झाली होती. सुधीर जोशी यांच्या निधनामुळे त्यांची अर्धवट राहिलेली ‘मातीच्या चुली’ चित्रपटामधील भूमिका आनंदने केली होती. ‘शो मस्ट गो ऑन’ असे म्हटले, तरी अर्धवट राहिलेली आनंद याची भूमिका आता कोण करेल हा प्रश्न आहेच. या दोघांशी माझी प्रत्यक्ष भेट झालेली नसली, तरी दूरदर्शनच्या माध्यमातून आमची ओळख होती. कुणीतरी आपलासा आहे, असे वाटेपर्यंत हे दोघेही कायमच्या प्रवासासाठी निघून गेले, असेही नाना पाटेकर यांनी सांगितले.
कवी संदीप खरे म्हणाला, या दुर्दैवी घटनेमुळे भक्ती बर्वे यांच्या अपघाताची आठवण झाली. कलाकारांना त्यांच्या कार्यक्रमासाठी अपरात्री फिरावे लागते. रस्त्यांची अवस्था इतके भीषण आहे की त्यावर रिफ्लेक्टर्स नसतात. त्यामुळे अगदी दहा फुटांवर आलेला ट्रक देखील दिसत नाही. आनंद आणि अक्षय यांना अपघात झालेला नाही. तर, बेदरकारपणे झालेले खून वाटतात. आपण रुमाल हातामध्ये घेऊन डोळे पुसायचे. पण, काही करायचे नाही, असे किती दिवस चालणार.
अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणाला, कामाचा व्याप आणि ताण सगळ्यांनाच असतो. या अपघातामध्ये चूक कोणाची हे निष्पन्न होईलच. पण, किती दिवस हे सहन करायचे. स्वत:चे आणि दुसऱ्याचे सांत्वन करायचे हा खरा प्रश्न आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग म्हणाल्या, या दुर्दैवी बातमीने धक्का बसला असून काही सुचत नाही. आपण काहीच करू शकत नाही. अगदी हताश असतो याची जाणीव झाली.
अभिनेता सुशांत शेलार म्हणाला, ‘दुनियादारी’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आम्ही रविवारी एकत्र होतो. वयाने मोठा असूनही आनंददादा आमच्यामध्ये मिसळायचा. तो आपल्यामध्ये नाही हे सत्य पचनी पडत नाही. दोन चांगले कलाकार आपल्यातून निघून गेले याचे दु:ख आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा