सांगली : आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने व जनजागृतीसाठी मिरज येथील इंधन साठवण आगारामध्ये सुरक्षा प्रात्यक्षिक घेण्यात आले. ही माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, सांगलीचे सहायक संचालक तथा स्थानिक अरिष्ट समूह सांगलीचे सदस्य सचिव प्र. अ. बोंदर यांनी दिली.

या प्रात्यक्षिक प्रसंगी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, कोल्हापूर विभागाचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालक अ. मो. अवसरे, उपसंचालक अ. भि. खरमटल, सहायक संचालक प्र. अ. बोंदर, सु. भि एकल, सु. वि. सुतार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ उपस्थित होते.

या वेळी कंपनीतील इंधन साठवणूक करत असलेल्या टाकीची गळती होवून त्याचे मोठ्या आगीमध्ये रुपांतर झाल्याचे दाखविण्यात आले. यावर आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या पथकाने यशस्वीपणे ही आग आटोक्यात आणून परिस्थिती पूर्ववत केली. यामध्ये कोणालाही इजा, नुकसान होणार नाही, याबाबत पूर्णत: काळजी घेऊन प्रात्यक्षिक पूर्ण करण्यात आले.

तत्पूर्वी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या कार्यालयात स्थानिक अरिष्ट समूहाची बैठक झाली. बैठकीनंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मिरज येथील कामगारांकरिता करम सेफ्टी इक्विपमेंट यांच्या मोबाईल डेमो व्हॅनद्वारे विविध वैयक्तिक सुरक्षा साधनांची माहिती देण्यात आली.

या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, मिरज येथील इंडियन ऑईल, भारत पेट्रोलिय, हिंदुस्थान पेट्रोलियमचे प्रतिनिधी, राजारामबापू साखर कारखाना, चितळे डेअरी, समर्थ इंडस्ट्रीज, किर्लोस्कर ब्रदर्स, शिमोगा केमिकल आदींचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते.

Story img Loader